संजय राऊतांची अवस्था भरकटून बुडायला लागलेल्या जहाजासारखी; मुरलीधर मोहोळ यांचा टोला
पुणे : ‘मोहोळांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा थक्क करणाऱ्या आहेत’, अशा शब्दात संजय राऊत यांनी ‘सामना’च्या अग्रलेखात काल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्लाबोल केला होता. यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज प्रतिउत्तर दिल आहे. “राऊतांची अवस्था भरकटून बुडायला लागलेल्या जहाजासारखी झाली आहे’ असे म्हणत मोहोळ यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, डोक्यावर परिणाम झाला आणि वास्तवाचं भान हरवलं की, असे टेबल न्यूजसारखे आरोप केले जातात. जम्बोचं प्रकरण अंगलट येतंय, याची जाणीव झाल्यावर हे असं दुसऱ्यावर शिंतोडे उडवणे सुरु आहे. खा. राऊतांची अवस्था भरकटून बुडायला लागलेल्या जहाजासारखी आहे, आशा शब्दात मोहोळ यांनी रावतांना उत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांनी काल सामना’च्या अग्रलेखात ” पुण्याचे महापौर मोहोळ यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा थक्क करणाऱ्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड मनपातील स्मार्ट सिटी घोटाळा ही जनतेच्या पैशांची लूट असून भाजपचेच लोक त्या लुटीचे भागीदार आहेत. नागपूर महापालिकाही या कामी मागे नाही. त्यामुळे भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी युद्धात पुणे, पिंपरी-चिंचवड मनपातील घोटाळ्यांचा समावेश आहे काय? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला होता त्यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
