पंजाबमधील ‘घुमान’ मध्ये भाषा भवन उभारणार सरहद संस्थेचा पुढाकार
पुणे : 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन या दिवशी मराठी भाषा जतन, संवर्धन आणि प्रसाराचा संकल्प केला जातो.
सरहद संस्थेच्या पुढाकाराने 2015 मध्ये ‘घुमान’मध्ये अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संत नामदेवांचा उत्तरार्ध घुमानमध्ये व्यतीत झाला आणि भारत भ्रमणामध्ये अनेक भाषांचा त्यांचा संपर्क आला. एका मराठी संताच्या या कर्मभूमीत पंजाबमध्ये मराठी भाषेचा भारतीय भाषांसाठी पुढाकार या प्रेरणेतून भाषाभवन उभारण्यात येणार आहे.
संत नामदेवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंजाबमधील घुमानमध्ये मराठी भाषेच्या पुढाकाराने भारतीय भाषांचा अभ्यास, संशोधन व देश जोडणारे ‘भारतीय भाषा भवन’ उभारण्याचा संकल्प करण्यात आला असून भाषा भवनमध्ये विविध भाषांच्या तज्ञांचा समावेश असेल पाच कोटी रूपये खर्च करून दोन एकर जागेमध्यपहीला टप्पा पुढील 3 वर्षात उभा करण्यात येणार असल्याची तसेच हे भाषा भवनचे काम पुढील महिन्यात सुरू होण्याची माहीती सरहद संस्थेचे संजय नहार आणि समन्वयक अरूण नेवासकर यांनी आज एका पत्रकाद्वारे दिली.
पंजाबमधील हरगोविंदपूर महामार्गावरील ‘किशनकोट’ तालूका बटाला या घुमानजवळील गावात 10,000 हजार चौ. फुटाचे ग्रंथालय, विविध भाषांचा अंतर्गत समन्वय, संत साहित्याचा अभ्यास आदिंसाठी सभागृह, तसेच यात्रीनिवास बांधण्यात येणार असल्याची माहीतीही पत्रकात देण्यात आली आहे. हा अशा प्रकारचा देशातील पहिलाच प्रकल्प असल्याची माहिती या पत्रकात देण्यात आली आहे.
