आंबिल ओढा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प – मालकी हक्काबाबत झोपडपट्टीधारकांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन..
पुणे : आंबिल ओढा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवीत असताना खाजगी विकसकाकडे अथवा इतर कोणत्याही स्थानिक स्वराज संस्थेकडे जागेचा कोणताही मालकी हक्क नसल्याचे निदर्शनास आले आहे. भविष्यात मालकी हक्काबाबत कायदेशीर वाद विवाद उदभवल्यास सध्या वास्तव्यास असलेले झोपडीधारक बेघर होऊ नयेत किंवा एस.आर.ए पुनर्वसन प्रकल्पापासून वंचित राहू नये म्हणून झोपडपट्टीधारकांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
सदाशिव पेठेतील मिळकत जुना सर्वे नंबर ४/२,४/३,४/४ ४/५ नवा सिटी सर्वे नंबर २१६ फायनल प्लॉट नंबर २ अ पर्वती, पुणे टी.पी. स्कीम क्रमांक ३ ही “मिराशी कुळ हक्काने” राऊत कुटुंबियांच्या नावे आहे. या मिळकतीची देवस्थान इनाम वर्ग तीन या शीर्षकाखाली जमीनीची नोंद सरकार दफ्तरी आहे.
गेल्या पन्नास वर्षापासून येथे ८५ झोपडीधारक राहत आहेत. याठिकाणी एस.आर.ए कडून प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. परंतु एस.आर.ए व पुणे मनपा यांच्याकडून झोपडपट्टीधारकांना सर्वे नं १३५ फायनल प्लॉट नं २८ या चुकीच्या सर्वे नंबरने पत्रव्यवहार होत आहे. झोपडपट्टीधारक राहत असलेल्या मिळकतीचे मालक राऊत कुटुंबीय आहेत. परंतु ०१/१०/२०२० रोजी एस.आर.ए.ने जाहीर केलेल्या प्रकटनात केदार अससोसिटस या खाजगी विकसकाचे नाव मालकी हक्कात घोषित केल्याचे पत्र आहे, त्यामुळे झोपडपट्टी तातडीने सोडण्यासाठी विकसक स्थानिकांवर दबाव टाकत आहे. त्यामुळे जागेच्या मालकी हक्काचा वाद तात्काळ मिटवावा त्यानंतरच पुनर्वसनाची पुढील प्रक्रीया राबवावी अशी मागणी झोपडपट्टीधारक सागर ढावारे यांनी केली.
