Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

वैज्ञानिक मॉडेल्समधून विद्यार्थ्यांनी मांडली स्वदेशी व आत्मनिर्भर भारताची संकल्पना

पुणे : जैव रासायनिक कचरा व्यवस्थापन…आॅटो फ्लोअर क्लिनर…उर्जा बचतीची उपकरणे…फायर रॉकेट…यांसारख्या नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्पांतून विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर भारताची आणि स्वदेशी संशोधन व साधनांची संकल्पना मांडली. पोस्टर्स आणि वैज्ञानिक प्रकल्पांचे केलेले सादरीकरण पाहण्यासोबतच डीआरडीओ यांच्यातर्फे मांडण्यात आलेली भित्तिचित्रे व मॉडेल्स पाहण्याकरीता देखील विज्ञानप्रेमींनी महोत्सवाला भेट दिली.

सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार, मुख्य वैज्ञानिक सल्लागार समिती भारत सरकार यांचे कार्यालय आणि विज्ञान प्रसार यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान सर्वत्र पूज्यते या विज्ञान प्रसार महोत्सवाचे आयोजन शिक्षण प्रसारक मंडळीचे सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विज्ञान प्रकल्प व पोस्टर प्रदर्शनाला शि.प्र. मंडळीच्या नियामक मंडळाचे सदस्य अ‍ॅड. मिहीर प्रभुदेसाई, सतिश पवार, डॉ.सुधीर काळकर आदी उपस्थित होते.

पुण्यासह इतरही शहरांमध्ये होणारी वाहतूककोंडी पाहता आॅटोमॅटिक स्ट्रिट लाईट कसे असावे, असा वैज्ञानिक प्रकल्प प्रदर्शनात मांडण्यात आला होता. तसेच, भूकंप झाल्यास कशी सूचना मिळेल, काय उपाययोजना करता येतील याची माहिती देणारे प्रकल्प देखील होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर आॅटोमॅटिक हँड सॅनिटायरचे मांडलेले मॉडेल देखील विज्ञानप्रेमींचे लक्ष घेऊन वेधून घेत होते. प्रदर्शनात एकूण ८० मॉडेल्स व ५० पोस्टर्स लावण्यात आले होते.

याशिवाय विज्ञान चित्रकला स्पर्धा, विज्ञान चित्रपट महोत्सव, विज्ञान वत्कृत्व स्पर्धा पार पडली. दरम्यान, डीआरडीओ चे संचालक प्रा. प्रदीप कुरुलकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. अरुण अडसूळ, डॉ.अभय जेरे आदी मान्यवरांची व्याख्याने देखील आयोजित करण्यात आली होती. विज्ञान महोत्सवांतर्गत प्रदर्शन, विविध स्पर्धा शालेय व महाविद्यालयीन गटांमध्ये सुरु असून जास्तीत जास्त संख्येने यामध्ये विज्ञानप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन शि.प्र.मंडळी तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading