पर्यावरण, आरोग्य, डिजिटलायझेशन क्षेत्रात नव्या पिढीला संधी : किशोर पाटील
पुणे : शाश्वत जीवनशैली आणि पर्यावरणाचे महत्त्व ओळखून आयुष्यात केवळ पैसा कमाविणे हा उद्देश न ठेवता समाजासाठी योगदान देणे आवश्यक आहे. पर्यावरणाबाबत युवा पिढी जागरूक असून पर्यावरण रक्षण, आरोग्य सेवा आणि डिजिटलायझेशन या क्षेत्रात नव्या पिढीला अनेक संधी उपलब्ध आहेत. ही पिढी या क्षेत्रात नक्कीच योगदान देईल, असा विश्वास केपीआयटीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ किशोर पाटील यांनी व्यक्त केला.
रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे प्रमुख पाहुणे किशोर पाटील आणि रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे अध्यक्ष विनायक पेठे यांच्या हस्ते व्होकेशनल अॅन्ड सर्व्हिस एक्सलन्स अॅवॉर्डस् प्रदान करण्यात आली. त्या वेळी पाटील बोलत होते. टीसीएसमधील असेम्ब्ली सेंटरचे प्रमुख चारुदत्त जाधव, सावा ग्रुपचे चेअरमन विनोद जाधव, प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. शाल, पुणेरी पगडी आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रसिद्ध बुद्धिबळ पटू चंद्रशेखर गोखले, रोटरी हेरिटेजच्या सेक्रटरी हर्षदा बावनकर व्यासपीठावर होते. रॉयल कॅनॉट, बोटक्लब येथे हा सोहळा झाला.
किशोर पाटील म्हणाले, पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून त्यांचा सन्मान माझ्या हस्ते होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. रोटरी क्लबतर्फे जागतिक पातळीवर राबविल्या जात असलेल्या उपक्रमांमुळे मी प्रभावित झालो आहे. भविष्यातील उपक्रमांबद्दल जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. देशाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यात सर्व क्षेत्रातील घटकांचे योगदान महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी देशातील उद्योजक मोलाची भूमिका बजावित आहेत.
डॉ. चारुदत्त जाधव म्हणाले, आयुष्यात कुठल्याही गोष्टीत, मूल्यांमध्ये तडजोड केली नाही आणि दृष्टीकोनही बदलला नाही. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची झालेली भेट यामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. लहानपणी अंधत्व आल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अंधत्व आलेले असताना डोळस व्यक्तींबरोबर बुद्धिबळ स्पर्धा खेळलो त्यात मिळालेल्या यशामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली यातूनच आपण आयुष्यात काहीही करू शकतो असा आत्मविश्वास मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया पुराणिक आणि शुब्रो सेन यांनी केले. आभार स्वाती मुळे यांनी मानले.
