Monday, June 22, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

एसटी संप चिरडण्यासाठी ठाकरे सरकारकडून पोलिसी यंत्रणेचा वापर- भाजपचा आरोप

एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा पहारा?

पुणे : गेल्या वर्षी १० नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात तोडगा काढून सुमारे एक लाख कुटुंबांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वाऱ्यावर सोडून महामंडळाच्या मालमत्ता खाजगीकरणाच्या माध्यमातून घशात घालण्याचा मोठा कट आखला जात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. केवळ कर्मचाऱ्यांच्याच नव्हे, तर एसटी बसगाड्यांवर विसंबून शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यही सरकारच्या नाकर्तेपणामुळे टांगणीवर लागले असून संप चिरडून कर्मचाऱ्यांना देशोधडीस लावण्याचे आघाडी सरकारचे कुटिल कारस्थान हाणून पाडण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर व्यापक जागृती मोहीम राबविण्यात येईल, अशी घोषणा भाजपचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांनी केली आहे.

तब्बल साडेचार महिने सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपातून तोडगा काढून महामंडळाचा घसरलेला गाडा मार्गावर आणण्यासाठी सरकारकडून कोणतेच प्रयत्न होत नाहीयेत. आता तर, संपकऱ्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्याच्या सक्त सूचना पोलिसांकरवी जारी झाल्या असल्याने आता पोलिसी बळाचा वापर करून कायदा सुव्यवस्थेचे कारण देत संप चिरडण्याचे मोठे कारस्थान आखले जात असल्याची भीती संपकऱ्यांमध्ये पसरली आहे. आता कोरोनाचा कहर कमी होत असल्याने शैक्षणिक कामकाज रुळावर येण्याची चिन्हे असतानाच, एसटी संपाबाबतच्या सरकारी बेपर्वाईमुळे पुन्हा शाळा व परीक्षांना ग्रामीण महाराष्ट्रातील एसटीवर अवलंबून असलेले लाखो विद्यार्थी मुकणार आहेत.  सरकारच्या या नाकर्तेपणामुळे राज्याच्या जनतेमध्ये प्रचंड चीड आणि असंतोष खदखदत असून सरकारने वेळीच संप मिटविण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत, व मालमत्ता घशात घालण्याचा विचार सोडून देऊन महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या लाल परीला पुन्हा जीवदान द्यावे अशी मागणीही श्री.जगदिश मुळीक यांनी या पत्रकाद्वारे केली आहे. एसटीच्या संपकाळात नैराश्य, आर्थिक दुर्दशा आणि कौटुंबिक तणावांमुळे जीवनाची अखेर करून घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या संपूर्ण पालनपोषणाची जबाबदारी आघाडी सरकारने घेतली पाहिजे, अशी मागणीही जगदिश मुळीक यांनी केली.

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे डोळेझाक करून केवळ कामावर हजर होण्याचे इशारे देत कारवायांची कारस्थाने करणे थांबवून सरकारने त्वरित या संपात सकारात्मक तोडगा काढावा असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading