‘मराठी सुंदर हस्ताक्षर’ स्पर्धेत सहभागी होणार १५ हजार विद्यार्थी
अक्षर रसिक सुलेखन वर्ग आणि व्हिनस ट्रेडर्स तर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजन
पुणे : अक्षर रसिक सुलेखन वर्ग आणि व्हिनस ट्रेडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा दिनानिमित्ताने मराठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील २५ शाळांमधून इयत्ता ३री ते ८वी पर्यंतचे तब्बल १५ हजारहून अधिक विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होत आहेत. शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत प्रातिनिधीक स्वरुपात सुमारे २०० विद्यार्थी एकाच वेळी शुक्रवार, दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता सुलेखन करणार असल्याची माहिती अक्षर रसिक सुलेखन वर्गाचे शैलेश जोशी व व्हिनस ट्रेडर्सचे सुरेंद्र करमचंदांनी यांनी दिली.
स्पर्धेत १६ मराठी माध्यमाच्या शाळा तर ९ इंग्लिश माध्यमाच्या शाळा सहभागी होणार आहेत. प्रशालेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा योग्य पारितोषिक देवून सत्कार केला जाणार आहे. तसेच सुंदर हस्ताक्षरासाठी मुलांना प्रोत्साहित करणा-या प्रत्येक शाळेला देखील सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. गेली ४७ वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात नाव मिळवलेले व्हीनस ट्रेडर्स आणि २५ वर्षांपासून सुलेखन क्षेत्रात अलौकिकपणे नाव मिळवलेले अक्षर रसिक सुलेखन वर्ग हे मराठी लेखन वृद्धीच्या दृष्टीने स्पर्धेद्वारे प्रयत्न करीत आहेत.
शैलेश जोशी म्हणाले, विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर हे नेहमी चांगलेच असले पाहिजे. सध्या लेखन कमी झाल्याने हस्ताक्षराची गोडी कमी झाली आहे. त्यामुळे हाताची बोट दुखणे, पटापट लिहू न शकणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. म्हणून आता शाळा सुरू झाल्या असल्याने त्यांना पुन्हा एकदा त्याचे महत्त्व समजावे, हस्ताक्षराची आवड निर्माण व्हावी म्हणून मराठी राजभाषा दिनानिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा यशस्वी व्हावी म्हणून क्लिक पेन कंपनी,सॅपलेंट यांचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.
