ओबडधोबड किल्ल्यांचा प्रदेश आणि मावळे हे शिवाजी महाराजांचे मोठे बलस्थान – इतिहास अभ्यासक विद्याचरण पुरंदरे
पुणे: आदिलशाही आणि कुतुबशाहीवर मात करण्यासाठी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आक्रमण केले पाहिजे, म्हणून मिर्झाराजे जयसिंह यांनी शिवाजी महाराजांचे बलस्थान ओळखले आणि ते काबीज करण्याचा प्रयत्न केला. इन्शा-ए-हफ्त अंजुमनमध्ये एक वाक्य आहे की, ओबडधोबड किल्ल्यांचा आणि पावसाळ्यात अचानक फुगणाऱ्या नद्यांचा प्रदेश आणि ज्यांना कोणीही नोकरी देणार नाही अशा लोकांना बरोबर घेवून केले तयार केलेले सैन्य, हे शिवाजी महाराजांचे सर्वात मोठे बलस्थान होते, असे मत इतिहास अभ्यासक विद्याचरण पुरंदरे यांनी व्यक्त केले.
इतिहास संस्कृती कट्टा आणि डॉ. चंद्रशेखर गणेश पेशवे आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. शिवाजी महाराजांची आग्रा भेट-पूर्वरंग या विषयावर भारत इतिहास संशोधन मंडळात व्याख्यान व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी या विद्याचरण पुरंदरे आणि इतिहासतज्ञ मंदार लवाटे यांच्या पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी करण्यात आली.
विद्याचरण पुरंदरे म्हणाले, जेंव्हा शिवाजी महाराज मिर्झाराजे जयसिंह यांना भेटण्यासाठी आले तेंव्हा शरणागतीच्या संदर्भातील चर्चा संपवून तुम्ही परत जायचे अशी अट मिर्झाराजे यांनी घातली. त्यावेळी तीन दिवस महाराज त्यांच्या तळावर राहिले होते. त्याचवेळी पुरंदरवर चढाई सुरू होती, तेव्हा महाराजांना दिसत होते आपले लोक गडावर लढत आहेत, मरत आहेत. मग शेवटच्या निष्कर्षाला येण्यासाठी महाराजांनी शरणागती पत्करली आणि पुरंदरचा तह झाला. त्यावेळी महाराजांचे मोठे नुकसान झाले, असे ही त्यांनी सांगितले.
शिवराम कार्लेकर यांनी प्रास्ताविक केले. उमेश जोशी यांनी आभार मानले.
