Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

पं. रोणू मुझूमदार यांचे बहारदार बासरीवादन

पुणे : गायिका मंजिरी असनारे-केळकर यांचे शास्रीय गायन आणि पं. रोणू मुझुमदार यांच्या बासरी वादनाने ‘गंगाधर स्वरोत्सव’ची सांगता झाली. ‘स्वरनिनाद’तर्फे आयोजित हा तीन दिवसीय महोत्सव सहकारनगर येथील मुक्तांगण बालरंजन केंद्र येथे पार पडला.

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात जयपूरच्या अत्रोली घराण्याच्या गायिका मंजिरी असनारे-केळकर यांनी राग ‘जयताश्री’ने गायनाला सुरुवात केली. ‘जयत’ आणि ‘श्री’ याचे मिश्रण असलेला हा राग आहे. ‘जबते पियू सपने मे आये’ या रुपक तालातील बंदिश त्यांनी यावेळी सादर केली. त्यानंतर ‘बहुत दिन बीते रे’ ही बंदिश गायली. नंतर बसंती केदार या दुसऱ्या जोड रागातील ‘अत्तर सुगंध गुलाब’, ‘नवेली नार’, ‘खेलन आयो री होरी’ या रचना सादर केल्या. ‘हो मियाँ जानेवाले’ हा टप्पा गाऊन ‘देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे’ या अभंगाने पहिल्या सत्राचा समारोप केला. त्यांना संजय देशपांडे (तबला), श्रीराम हसबनीस (संवादिनी), देवश्री नवधरे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

महोत्सवाच्या या वर्षीच्या शेवटच्या सत्रात पं. रोणू मुझुमदार यांचे बासरी वादन झाले. राग ‘झिंझोटी’ने त्यांनी बासरी वादनाला सुरुवात केली. वैविध्यपूर्ण तिहाई साडेसात तालात सादर केल्यानंतर मुझुमदार यांनी पुन्हा तीन तालात मधुर रचना सादर केल्या. तसेच ‘नंद’ रागातील बासरीसाठी अवघड असणारी एक बंदिश त्यांनी लीलया सादर केली. त्यानंतर पहाडी रागातील एक रचना सादर केली. शेवटी ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’ या गीतावर वादन करून भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली वाहून यंदाच्या महोत्सवाची सांगता केली. त्यांना अरविंदकुमार आझाद (तबला) आणि कल्पेश (बासरी) यांनी साथसंगत केली. महोत्सवाचे तीनही दिवस मधुरा ओक-गद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading