व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना हिंदू संस्कृतीची ओळख
पुणे : व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना हिंदू संस्कृती देखील समजायला हवी. यासाठी जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीने प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी व्हॅलेंटाईन डे हा दिवस साजरा न करता मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करण्याचे निश्चित केले तसेच हिंदू संस्कृतीचे आचरण आणि रक्षण करण्याचा निश्चय केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर उपस्थित होते. हिंदू जनजागृती समितीच्या क्रांती पेठकर, गार्गी पाटील, चारुशीला चिंचकर आणि शशांक सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना व्याख्यानाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. पॅराडाईज ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य स्मिता कुलकर्णी यांनी पाच व्याख्यानांचे नियोजन आणि समन्वय केले.
प्रा. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील विद्यार्थी, प्रा. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ११ वी-१२ वीचे विद्यार्थी, पॅराडाईज इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अॅड. शार्दुल सुधाकरराव जाधवर ज्युनिअर कॉलेजमधील ११ वी-१२ वीचे विद्यार्थी तसेच इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांकरीता व्याख्यान झाले. व्याख्यानामध्ये व्हॅलेंटाईन-डे चा इतिहास, त्याचे परिणाम, व्यावसायिक हेतुने होणा-या व्हॅलेंटाईन-डे चा प्रसार, त्या उलट महान हिंदु संस्कृतीचे श्रेष्ठत्व सांगण्यात आले.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटायला हवा. ‘व्हॅलेंटाईन डे’ प्रबोधन करण्यासाठी जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट येथे हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या शाखांमध्ये ५ व्याख्याने घेण्यात आली.
