विश्व हिंदू परिषद मठ मंदिर संपर्क समितीतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निदर्शनांचा निषेध
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कर्नाटकमध्ये झालेल्या हिजाबला पाठिंबा म्हणून गंज पेठेतील महात्मा फुले स्मारक येथे निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाळून मारा अशा घोषणा देण्यात आल्या, या घटनेचा विश्व हिंदू परिषद, मठमंदिर संपर्क समितीने निषेध नोंदवला आहे.
याबाबत विश्व हिंदू परिषद, मठमंदिर संपर्क समितीने पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. आणि अशा प्रकारच्या घोषणांचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मठमंदिर संपर्क प्रमुख मनोहर ओक म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हिजाबला पाठिंबा देण्यासाठी म्हणून झालेल्या निदर्शनात नरेंद्र मोदी यांना जाळून मारा अशा घोषणा देण्यात आल्या, देशाच्या दृष्टीने अशा घोषणा घातक आहेत. तसेच महात्मा फुले स्मारक हे ऐतिहासिक ठिकाण आहे येथे अशा कार्यक्रमांना कोणी परवानगी दिली याची चौकशी करावी आणि यासंबंधी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आम्ही विश्व हिंदू परिषद मठ मंदिर संपर्क समितीच्यावतीने केली असल्याचे त्यांनी सांगितले.
