पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
पुणे : पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा साधना विद्यालय, हडपसर येथे संघटनेचे अध्यक्ष प्रदिप बागल यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यासभेसाठी संघटनेचे जिल्हातून १५० सदस्य उपस्थित होते.
सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून साधना विद्यालयाचे प्राचार्य, विजय शितोळे, लोणकर माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, म्हेत्रे सर व साधना विद्यालयाचे उपमुख्याध्यापक कुंभार हे उपस्थित होते.
शितोळे सरांनी शाळेतील ग्रंथालय आणि ग्रंथपाल यांचे महत्व अधोरेखित करून शाळा तिथे ग्रंथालय व पूर्णवेळ ग्रंथपाल असावेत अशी मागणी केली. यासाठी राज्य मुख्याध्यापक संघाच्या वतीने पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
सभेचे कामकाज संघटनेचे कार्यवाह, तानाजी कांबळे यांनी पहिले. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष अशोक शिंदे, विश्वस्त, शंकरराव घोरपडे, उपाध्यक्ष, विजयराव साळुंके, वंदना तारू, सहकार्यवाह, सुनिल जेजुरकर, कोषाध्यक्ष, मनीषा साठे, अंतर्गत हिशोब तपासनीस गीता कऱ्हाडकर, सर्व तालुका प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अर्धवेळ ग्रंथपाल उन्नयन प्रक्रिया, पदवीधर ग्रंथपाल वेतनश्रेणी मिळणेबाबत सुरु असलेली कार्यवाही, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पंडित वाघमारे, लक्ष्मण कोल्हे, संदीप गायकवाड यांनी याबाबत सर्व सदस्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने दिनांक ०१ जून २०२१ ते दिनांक ३१/०५/२०२२ या शैक्षणिक वर्षामध्ये सेवानिवृत्त होत असलेल्या सदस्यांचा मानपत्र, स्मृतिचिन्ह, पुस्तक व गुलाबपुष्प देऊन त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रदिप बागल यांनी शालेय ग्रंथपालांच्या समस्या सोडविण्यासाठी करण्यात येत असलेल्या कामाचा आढावा घेतला व सर्व शैक्षणिक संघटनांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
