Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

भारतीय गणित ग्लोबल व्हावे : प्रा. मिशिओ यानो

पुणे : ‘भास्कराचार्यांच्या लीलावती या गणितावरील ग्रंथातून भारतीय गणिताच्या प्रतिभेची चुणूक पाहायला मिळते.जपानमध्येही अनेक दशकापासून भाषांतरित पुस्तकातून त्याचा अभ्यास होतो.भारतात शालेय विद्यार्थ्यांपर्यंत या गणित संकल्पना पोहोचल्या पाहिजेत,भारतीय गणित ग्लोबल होण्यासाठीही अधिक परिश्रम घेतले पाहिजेत’,असे प्रतिपादन जपानच्या सायन्स कौन्सिलचे माजी सदस्य प्रा.मिशिओ यानो यांनी केले.

गणिताची गोडी निर्माण करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या ‘अंकनाद-गणिताची सात्मीकरण प्रणाली’ द्वारे आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स तर्फे आयोजित भास्कराचार्यांच्या ‘लीलावती’ ग्रंथावरील वर्षभर चाललेल्या व्याख्यानमालेचा समारोप रविवार,१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता झाला.

या समारोपाच्या सत्रात प्रा. मिशिओ यानो यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.गणित अभ्यासक प्रा.सुधाकर आगरकर यांनी वर्षभर या मासिक व्याख्यानमालेत मार्गदर्शन केले.दरमहा २ याप्रमाणे एकूण २४ सत्रातुन त्यांनी लिलावतीमधील गणितज्ञानाचा परिचय करून दिला.आजच्या शेवटच्या सत्रात त्यांनी कुट्टक व्यवहार,संख्याभेद,अंक पाश (परम्युटेशन,कॉम्बिनेशन)संकल्पनांचा परिचय करून दिला.

समारोपाच्या सत्राला जपानच्या सायन्स कौन्सिलचे माजी सदस्य प्रा.मिशिओ यानो आणि विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.विजय बेडेकर,मॅप एपिक कम्युनिकेशन्सचे संचालक मंदार नामजोशी,समीर बापट,वैशाली लोखंडे,गणिताचे अभ्यासक,विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते.आसावरी बापट यांनी श्लोकांचे वाचन केले.

डॉ.सुधाकर आगरकर म्हणाले,’भारतीय गणिती वारसा पुढे आणण्याच्या उद्देशाने,आपल्या इतिहासात दडलेलं गणिती वैभव मांडणारा एक अभिनव उपक्रम म्हणून या व्याख्यानमालेकडे पाहिले पाहिजे.भास्कराचार्यांनी त्यांच्या लीलावती या मुलीसाठी गणिताचा कल्पवृक्ष ‘लीलावती’नावाने लिहिलेल्या ग्रंथातून लावला आणि जगभर त्याची ख्याती आहे.संवादातून,काव्यमय श्लोकातून भास्कराचार्य गणितासारख्या विषय मांडतात,हे जागतिक शिक्षण क्षेत्रातील अद्भुत उदाहरण आहे.

भास्कराचार्यांनी गणित सोडवून घेण्याच्या पडताळ्याच्या अभिनव पद्धती निर्माण केल्या. प्रत्येक वेळी उत्तराची खात्री करून घेतली जात होती.१८ व्या शतकापासून लीलावती ‘ ग्रंथाची इंग्रजीत भाषांतरे सुरु झाली. भारतीय तसेच परदेशी संशोधकांनी ही भाषांतरे केली . १८८९ मध्ये संस्कृत लिलावतीचे मराठीत भाषांतर झाले. भास्कराचार्यांनी पुस्तकात एकही गणित सोडवून दाखवलेले नाही .तयार उत्तरे दिली नाहीत . मात्र,पद्धती शिकवल्या . जपानी संशोधक म्हणतात त्याप्रमाणे भारतातील घराघरात या ग्रंथाचे वाचन व्हायला हवे .गणित हे गंधहीन ,रस हीन गोष्ट नाही हे भास्कराचार्य यांच्यामुळे जगाला लक्षात आले,असेही डॉ.आगरकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading