पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेच्या पुतळ्याचे अनावरण 14 फेब्रुवारीला – उदय सामंत
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार असून येत्या 14 फेब्रुवारीला राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यासमवेत राज्याचे मुख्यमंत्री ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. यावेळी उदय सामंत यांनी विविध मुद्यावर भाष्य केले.
विद्यापीठाच्या सर्व परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने
कॉलेजच्या परीक्षा ऑफलाइन का ऑनलाइन होणार? यावरून वाद चालू आहे त्यावर उदय सामंत म्हणाले ,त्याच बरोबर विद्यापीठाच्या सर्व परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कोणतेही वर्तन विद्यार्थ्यांनी करू नये असे आवाहन देखील उदय सामंत यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्र्यांची कोणी बदनामी करू नये
किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्या नंतर त्यांनी ‘मला मारण्यासाठी गुंड पाठवले होते’, असा आरोप मुख्यमंत्र्यांवर व संजय राऊत यांच्यावर किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले, किरीट सोमय्या किती प्रमाणिक आहेत हे उभ्या देशाला माहिती आहे. मुख्यमंत्र्याना कुणीही बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. महानगरपालिकेत जो प्रकार झाला त्यात किरीट सोमय्या यांना त्यांच्या अंगरक्षकांनी ढकललंय अस दिसत आहे, असे उदय सामंत म्हणाले.
