भारतरत्न लता मंगेशकर यांना रंगावली व ९३ दीप लावून अभिवादन
पुणे : शत शत जे भाग्य आम्हास लाभले, कंठ कोकीळ स्वराचे स्नान आम्हास घडले, रत्न नव्हे भारतरत्न आमचे, का आमच्यातून असे निघून गेले, लतादीदी तुम्ही होणे नाही पुन्हा…. असे शब्द रंगावलीतून साकारत गानकोकिळा स्वर्गीय लता मंगेशकर यांना ६ बाय २० आकारातील रंगावली व ९३ दीप लावून अभिवादन करण्यात आले.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट आणि शार्प इंडिया कामगार संघटनेतर्फे लता मंगेशकर यांचे पुण्यातील शुक्रवार पेठेतील ज्या घरी वास्तव्य होते तेथे भव्य रंगावली व दिवे लावून अभिवादन करण्यात आले. यावेळी आनंद सराफ, प्रशांत मते, विक्रांत मोहिते, कुणाल जाधव, अमर लांडे, बापू नाईक, सदाशिव कुंदेन, पियुष शाह, आनंद सगरे, रवी किरवे,राजेंद्र पवार, मंगेश गावडे, कैलास परदेशी, सौरभ कांबळे, सतीश चव्हाण, संदीप गायकवाड उपस्थित होते. मदन कस्तुरे हे या ऐतिहासिक वास्तूचे मालक असून त्यांनी यावेळी वाड्याविषयीच्या आठवणी सांगितल्या.
रंगावलीकार सुनील सोनटक्के, अमर लांडे आणि वैशाली सोनटक्के यांनी रंगावली साकारली. शुक्रवार पेठेतील श्रीनाथ टॉकीज च्या समोरील लेनमध्ये संगीत रत्न मास्टर दीनानाथ मंगेशकर १९४० – १९४२ या काळात राहत होते, यावेळी लता मंगेशकर यांचे देखील या वास्तूत वास्तव्य होते. त्याठिकाणी हा कार्यक्रम झाला.
