संगीत विश्वातील ध्रुवतारा हरपला; गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन
मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज (दि. 6) सकाळी सव्वा आठच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिनाभरापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रातील एक सुवर्ण पर्व संपले आहे.
गानकोकीळा लतादिदींच्या जाण्याने सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 6.30 वा. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनामुळे दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. दुर्दैवाने आज त्यांचे निधन झाले.
