Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

पुणे विद्यापीठातील संशोधनाला मिळणार पेटंटची दिशा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व ‘वी गो लायब्ररी फाउंडेशन’ यांच्यामध्ये सामंजस्य करार

पुणे : विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर अनेक विद्यार्थी संशोधन करतात. मात्र पेटंट नोंदविण्याची पुरेशी माहिती नसल्याने अनेक चांगली संशोधन जगासमोर येत नाहीत. त्यामुळेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘वी गो लायब्ररी फाउंडेशन’ सोबत सामंजस्य करार करत विद्यार्थ्यांना पेटंट नोंदणीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नुकत्याच या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर तसेच डॉ. डी. जी.कान्हेरे, फाउंडेशनचे संस्थापक निलेश पावसकर, संजय साळुंखे आदी उपस्थित होते.

या करारानुसार ‘वी गो लायब्ररी फाउंडेशन’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पेटंट नोंदणीसाठी कायदेशीर मदत, आर्थिक सहाय्य, प्रायोजकत्व, मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उत्पादन जागतिक स्तरावर नेण्यासाठी मदतही करण्यात येईल.

फाउंडेशनचे संचालक निलेश पावसकर म्हणाले, फाउंडेशनच्या माध्यमातून दीडशे वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी यावर काम करत आहेत. विद्यार्थ्यांना या तज्ज्ञ मंडळींच्या मदतीने विद्यार्थी पेटंट नोंदणी प्रक्रियेत पुढे जाऊ शकतील. यामुळे विद्यापीठातील संशोधनाला चालना मिळून नवोपक्रम उभारण्यास याची मदत होईल.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, एखाद्या विषयात संशोधन झाल्यानंतर ते संशोधन नोंदणीकृत होण्यापर्यंत अनेक कायदेशीर व तांत्रिकबाबी पार पाडाव्या लागतात. विद्यार्थ्यांना याबाबत फारशी माहिती नसल्याने अनेकदा पेटंट चे काम अर्धवट राहते. या काळात त्यांना योग्य मार्गदर्शन आणि तांत्रिक बाबींची माहिती मिळाली तर त्यांचे काम सोपे होईल व अधिकाधिक संशोधक या प्रक्रियेत सहभागी होतील, अशी आशा वाटते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading