बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास युवासेनेकडून रुग्णवाहिका प्रदान
पुणे : राज्यात गेल्या एक वर्षात आरोग्य यंत्रणा आणि आरोग्य व्यवस्था या दोन्ही बाबत प्रचंड जागरूकता निर्माण झाली आहे तसेच त्याचे महत्व देखील अधिक अधोरेखित झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतराष्ट्रीय पातळीचे विद्यापीठ असून इथे देशभरातील तसेच विदेशातील देखील अनेक विद्यार्थी शिकतात. पुणे शिक्षणाचे माहेर घर असल्याने विद्यापीठाचे महत्व अधिक वाढते. विद्यापीठात मात्र अनेक सोयी सुविधांची पूर्तता झालेली नाही. त्यातील एक म्हणजे विद्यापीठाचे आरोग्य केंद्र, या केंद्रात गरज असणारी रुग्णवाहिका नसल्याने अनेकदा विद्यार्थ्यांची अडचण होते. हजारो विद्यार्थी इथे निवासासाठी आहेत. अशा वेळी रुग्णवाहिका असणे ही प्रचंड गरजेची बाब आहे. हाच विचार करून हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. २३) रोजी युवासेनेचे राज्यसहसचिव कल्पेश यादव यांनी रुग्णवाहिका प्रदान करणार असल्याचे सांगितले. या रुग्णवाहिकेचा विद्यापीठाने स्वीकार करावा असे पत्र त्यांनी आज कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना दिले आहे. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ युवासेना कक्ष अध्यक्ष कुणाल धनवडे,सरचिटणीस परमेश्वर लाड,सचिव ज्ञानंद कोंढरे,उपाध्यक्ष विशाल हुलावळे देखील उपस्थित होते.
यादव म्हणाले, हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी नेहेमीच समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून योग्य ती कृती आणि काम करण्याची प्रेरणा स्वतःच्या कार्यातून प्रत्येक शिवसैनिकाला दिली आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे साहेबांची तर खुद्द सन्मानीय कोर्टाने कोविड परिस्थिती नियंत्रणासाठी स्तुती केली आहे. त्यामुळेच आम्हा शिवसैनिकांनी आरोग्य व्यवस्थे बाबत जागरूक राहणे ही आमची जबाबदारी आहे. युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री मा. आदित्य साहेब ठाकरे यांनी नेहेमीच पर्यावरण तसेच आरोग्य याबाबत योग्य ती खबरदारी आणि जबाबदारीची वागणूक आम्हाला शिकवली आहे.
तरुणांच्या हितासाठी काम करणे हेच युवासेनेचे मुख्य तत्व असल्याचे देखील स्वतः आदित्य साहेब ठाकरे यांच्या कृतीतून सिद्ध नेहमीच सिद्ध होते. याच प्रेरणेने हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठ प्रशासनास रुग्णवाहिका प्रदान करणार आहोत. विद्यार्थी हित आणि आरोग्य हे प्रत्येक शैक्षणिक संकुलाचे मुख्य कर्तव्य आहे, त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने या रुग्णवाहिकेचा स्वीकार करावा अशी विनंती आज कुलगुरूंकडे केली असल्याचे देखील यादव यांनी सांगितले.
