१५ व्या वसंतोत्सवास दिमाखात सुरुवात
पुणे : डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या वतीने आणि गोखले कन्सट्रक्शन्सच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या १५ व्या वसंतोत्सवास आज स्वारगेट येथील गणेशकला क्रीडा येथे सुरुवात झाली.
डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचे विश्वस्त बापू देशपांडे, रेणुका देशपांडे, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, डॉ. संजय उपाध्ये, डॉ. प्रीती जोशी, अजित गाडगीळ, हरिदास आहेर, गोखले कन्सट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले, संचालिका पूनम गोखले, पर्ल वर्गिस आदी मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले.
फरुखाबाद घराण्याचे प्रसिद्ध सतार व तबलावादक पं. नयन घोष व त्यांचे सुपुत्र ईशान घोष यांच्या सतार व तबला जुगलबंदीने महोत्सवाला सुरुवात झाली. पं. नयन घोष यांनी राग पटदीपने आपल्या सतार वादनाला सुरुवात केली. त्यांनी विलंबित तीन ताल, द्रुत तीन ताल सादर केले. यानंतर सतारवर दुर्मिळपणे वाजविला जाणारा राग कामोद त्यांनी सादर केला. यानंतर मध्य लय तीन तालातील दोन गती व द्रुत तीन तालातील गत सादर केली. उपशास्त्रीय प्रकारातील केहरवा तालातील ‘निम्बुवा तले डोला रख दे मुसाफिर आई सावन की बहार रे’ ही कजरी सादर करीत त्यांनी आपल्या सादरीकरणाला विराम दिला.
आपले वडील पं. निखिल घोष, पं. वसंतराव देशपांडे आणि पु. ल. देशपांडे हे चांगले मित्र होते, असे सांगत पु. ल. देशपांडे यांच्या मुंबईतील घरी अनेकदा हे सर्व जण रविवारी एकत्र यायचे. यावेळी वसंतराव गायचे तर त्यांना आपले वडील तबला आणि पु. ल पेटीवर साथ द्यायचे अशा आठवणी पं. नयन घोष यांनी सांगितल्या. ईशान घोष यांनी पं.नयन घोष यांना समर्पक तबलासाथ केली.
त्यानंतर प्रसिद्ध व्हायोलीनवादक पद्मभूषण एल. सुब्रमण्यम आणि त्यांचे सहकारी यांचे व्हायोलीनवादन झाले. कर्नाटक शैलीतील मोहनमने त्यांनी आपल्या वादनाला सुरुवात केली. यानंतर अभोगी रागातील गणपती स्तुती त्यांनी सादर केली. दाक्षिणात्य शैलीतील राग बिहाग आणि रूपक तालातील तिल्लना त्यांनी सादर केला. भैरवीने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. यावेळी तन्मय घोष यांनी (तबला), परुपल्ली फाल्गुण (मृदंगम), त्रिपुणीतुरा राधाक्रिष्णन (घटम), त्रिपुणीतुरा श्रीकांत (खंजिरा), सत्य साई (मोरसिंग) आणि सिद्धी कापशीकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
महोत्सवात उद्या दि. २१ जानेवारी रोजी सायं ५ वाजता व्हायोलीनवादक पं.अतुलकुमार उपाध्ये आणि प्रसिद्ध सारंगीवादक दिलशाद खान यांची व्हायोलीन व सारंगी अशी जुगलबंदी रसिक श्रोत्यांना अनुभविता येणार. त्यानंतर जयपूर अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या गायनाने दुस-या दिवसाचा समारोप होईल.
