fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे मेट्रो कंपनी विरोधात हक्क भंगाचा प्रस्ताव आणणार – चंद्रकांत पाटील 

शरद पवारांची पुणे मेट्रोला भेट, चंद्रकांत पाटलांचा आक्षेप

मुंबई : पुण्यातील कोणत्याही आमदाराला किंवा खासदाराला सहभागी न करून घेता किंवा न कळवता शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोची ट्रायल केली गेली. अशा प्रकारे घाईघाईत ट्रायल घेण्याचे कारण काय? आमदारांच्या हक्कावर ही गदा आहे. या विरोधात मी विधीमंडळात पुणे मेट्रो विरोधात हक्क भंगांचा प्रस्ताव दाखल करणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितले.

आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पिंपरीतील फुगेवाडी ते संत तुकाराम नगर असा पुणे मेट्रो प्रवास आज केला. पुणे मेट्रोचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. त्यामुळे ऐनवेळी आज सकाळी पुणे मेट्रोला शरद पवार यांनी ‘सरप्राइज विजिट’ दिली. यावरून पुणे मेट्रोच्या श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

माध्यमांना प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्यातील कोणत्याही आमदाराला किंवा खासदाराला सहभागी करून न घेता किंवा न कळवता शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोची ट्रायल केली गेली. पवार साहेबांबद्दल आदर आहेच त्यांच्या राजकीय, सामाजिक जीवनाला 50 वर्ष झाली आहेत. ते राज्यसभा सदस्यही आहेत. परंतु अशा प्रकारे घाईघाईत ट्रायल घेण्याचे कारण काय? ही काय श्रेयवादाची लढाई चालली आहे का? आमदारांच्या हककावर ही गदा आहे. त्यामुळे मी पुणे मेट्रो कंपनी विरोधात हक्क भंगाचा प्रस्ताव आणणार आहे. तसेच मी पुण्यातील सर्व  आमदारांना आवाहन करतो की त्यांनी सुद्धा पुणे मेट्रो विरोधात हक्क भंगांचा प्रस्ताव आणावा.

पुढे बोलताना ते म्हणाले, मेट्रोची चाचणी करायची होती तर त्यासाठी केवळ शरद पवार यांना का निमंत्रित केले असा आपला मेट्रो प्रशासनाला सवाल आहे. पुण्यात आठ विधानसभा सदस्य आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये तीन विधानसभा सदस्य आहेत. पुण्याचे खासदार गिरीश बापट आहेत. माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर हे पुण्याचे निवासी आहेत. मेट्रो प्रशासनाला उद्घाटनपर धाव घ्यायची होती तर त्यांनी या सर्व लोकप्रतिनिधींना तसेच पुण्याच्या महापौरांना सन्मानाने सहभागी करायला होते. त्यांनी केवळ एका नेत्याला श्रेय देण्याचा का प्रयत्न केला, असा माझा सवाल आहे.

 

 

One thought on “पुणे मेट्रो कंपनी विरोधात हक्क भंगाचा प्रस्ताव आणणार – चंद्रकांत पाटील 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading