fbpx

काश्मीरमधील १२०० सैनिकांना गणेशाचा तिळगूळाचा प्रसाद 

पुणे : त्यागाचे प्रतिक आणि देशभक्तीचे मूर्तीमंत उदाहरण असलेल्या भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता पुण्यातील नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्टने पुढाकार घेतला. जम्मू-काश्मीरमधील १२०० सैनिक आणि ३०० स्थानिक नागरिक अशा १५०० जणांना पुण्यातून तिळगूळाचा गणेशाचा प्रसाद पाठविण्यात आला. सिमेवर बर्फाने अच्छादित डोंगरपायथ्याशी या तिळगूळाचे पूजन करुन सैनिकांनी तेथे मकरसंक्रांतीचा सण उत्साहात साजरा केला.
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात तैनात असलेल्या राष्ट्रीय रायफल १० तुकडयांतील जवान व स्थानिक नागरिकांना या तिळगूळाचे किट पाठविण्यात आले. या उपक्रमाकरीता स्वारद फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्वाती शरद मोहोळ, प्राईम ट्रॅक कुरियर कंपनीचे चेतन चौधरी, मयूर पाटील, मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ६१ देशभक्त नागरिकांनी सहकार्य केले.

मंडळातर्फे पुणेकरांना तिळगूळ जमा करण्याकरीता आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार १५० किलो तिळाच्या वडया, लाडू व हलवा एकत्र करण्यात आला. त्यानंतर तो प्रत्यक्ष सिमारेषेवर सैनिकांना पाठविण्यात आला. तसेच तेथील लष्करी अधिकारी व सैनिकांना प्रातिनिधीक स्वरुपात मानपत्र देखील पाठविण्यात आली. सीमारक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे देवकार्य पुणेकरांच्या हातून व्हावे, या उद््देशाने उपक्रम राबविण्यात आला.
तिळगूळ आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर आम्हाला आमच्या घराची आठवण आली. आमच्याबद्दल देशवासियांचे प्रेम, भारतीय सेनेविषयीची असलेली आपुलकीची भावना यामुळे हजारो किमी असलेल्या पुण्यातून आम्हाला तिळगूळ पाठविण्यात आल्याचा आम्हाला आनंद असल्याची भावना सैनिकांनी व्यक्त करीत याचा व्हिडिओ देखील मंडळाला पाठविला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: