व्यसनांच्या प्रतिकात्मक राक्षसाचे दहन करीत विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

पुणे : दारु, गुटखा, चरस, सिगारेट, गांजा यांसारख्या व्यसनाधिनतेकडे नेणा-या पदार्थांपासून आम्ही दूर राहू. व्यसनाधिनतेकडे वळणा-या तरुणाईला त्यापासून परावृत्त करण्यास प्रयत्न करु, अशी शपथ घेत नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला. व्यसनांच्या प्रतिकात्मक राक्षसाचे दहन करीत व्यसनमुक्त युवा… व्यसनमुक्त भारताचा संकल्प देखील करण्यात आला.

जाधवर ग्रुप च्या इन्स्टिटयूट आॅफ नर्सिंग व डॉ.सुधाकरराव जाधवर कॉलेज आॅफ पॅरामेडिकल यांच्यातर्फे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त व्यसनांच्या प्रतिकात्मक राक्षसाचे दहन व शपथ कार्यक्रमाचे आयोजन न-हे येथील संस्थेच्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी इन्स्टिटयूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, इन्स्टिटयूट आॅफ नर्सिंगच्या शितल भोसले, अनुश्री पारगे उपस्थित होते. महाविद्यालयातील नर्सिंगच्या विद्यार्थीनी या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.

प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर म्हणाले, महाविद्यालयात व्यसनाधिनतेपासून परावृत्त करणारे उपक्रम राबविणे अत्यंत गरजेचे आहे. व्यसनाधिनता ही वाईट संगतीतून निर्माण होते आणि ही संगत महाविद्यालयीन काळात लागण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगले संस्कार करुन नव्या पिढीला चांगल्या दिशेने नेण्याकरीता असे जनजागृतीपर उपक्रम सातत्याने राबविले जातात.

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, व्यसनांच्या विळख्यात अडकणा-या मुलांच्या संख्येइतकेच मुलींचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे व्यसनांपासून सर्वांनी परावृत्त व्हावे, याकरीता आम्ही नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. आजच्या पिढीने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांसारख्या महापुरुषांचा आदर्श घ्यायला हवा. नर्सिंगच्या माध्यमातून पुढे या महाविद्यालयातील विद्यार्थीनी रुग्णसेवा करतात. परंतु व्यसनापासून दूर राहिल्यास आरोग्य खराब होणार नाही, हे तरुणाईला समजावे, याकरीता असे उपक्रम राबविले जातात.

Leave a Reply

%d bloggers like this: