स्वामी विवेकानंद ही बंधुत्वाची खरी ओळख – युवराज शहा

पुणे : जाती, धर्म, पंथ अशा विविधतेने नटलेला आपला भारत देश आहे. हिंदू धर्माचा परिचय विवेकानंदांनी ख-या अर्थाने जगाला करुन दिला. भारतात बंधूभावाची भावना असली, तरी देखील ती स्वामी विवेकानंदांनी जगाला करुन दिली. त्यामुळे स्वामी विवेकानंद ही बंधुत्व व भाईचा-याची ओळख आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते युवराज शहा यांनी व्यक्त केले.

ग्राहक पेठेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेच्या प्रांगणात स्वामीजींना अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक उपस्थित होते. स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला.

युवराज शहा म्हणाले, आज समाज आत्मकेंद्री झाला आहे. माझे कल्याण म्हणजे जगाचे कल्याण, असा प्रत्येकाचा विचार असून समाजाचा कोणीही विचार करत नाही. गैरमार्गाने पैसे कमविण्याचा प्रयत्न देखील केला जातो. त्यामुळे स्वामी विवेकानंदांनी आयुष्याला विसरु नका, सोबत घेऊन जा, हा दिलेला संदेश प्रत्येकाने लक्षात ठेऊन आचरणात आणायला हवा.

सूर्यकांत पाठक म्हणाले, स्वामी विवेकानंद हे युवकांचे नेतृत्व आहे. त्यांचा आदर्श घेऊन कार्य करणारे अनेकजण आहेत. युवा पिढीसाठी कार्य करणारे पुण्यात देखील अनेक कार्यकर्ते आहे. त्यांना स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने सन्मानित करुन त्यांची ओळख समाजाला व्हावा, असा प्रयत्न आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: