सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्वामी विवेकानंद व जिजाऊ माँ साहेब जयंती साजरी
पुणे : समृद्ध विकसित युवक घडवण्याचे काम स्वामी विवेकानंदांनी केले तर जिजाऊं माँ साहेबांच्याच्या प्रेरणेने अनेक शिवबा घडले आहेत असे विचार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित जयंती कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्वामी विवेकानंद व जिजाऊ माँ साहेब जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विद्यार्थी विकास मंडळातर्फे ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा करण्यात आला. त्यानिमित्त राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, तर जिजाऊ माँ साहेब यांचे विचार सांगण्यासाठी ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे उपस्थित होते.
यावेळी चारुदत्त आफळे यांनी पूर्ण विकसित युवक कसा असावा याबाबत सांगितले. ते म्हणाले, केवळ एकच गोष्ट सर्वश्रेष्ठ न मानता सर्वांगाने विकसित युवक होण्यासाठी प्रयत्न करायला हवे. स्वामी विवेकानंदांकडे साधना, सामर्थ्य, सेवा, संवेदनशीलता, सापेक्ष, सहिष्णुता, सकारात्मकता, स्वामित्व असे सर्व गुण होते. चुकीच्या गोष्टींचे कोळसे उगाळत बसण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीतून चांगले तेवढे घ्या असा सल्लाही त्यांनी उपस्थित युवा पिढीला दिला.
पांडुरंग बलकवडे यांनी जिजाऊ माँ साहेब यांनी शिवबांना घडवण्यासाठी घेतलेले परिश्रम व दिलेल्या शिक्षणाबाबत आपल्या ओघवत्या शैलीत श्रोत्यांसमोर मांडले.
डॉ. नितीन करमळकर म्हणाले, विवेकानंदांनी केवळ अध्यात्म नाही तर विज्ञान आणि समाजशास्त्र याचाही पुरस्कार केला. भारतीयांचं मूळ सामर्थ्य जागृत करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला.
राजेश पांडे म्हणाले, स्वामी विवेकानंद आणि जिजाऊ माँ साहेब या दोन्ही महान व्यक्तींचे विचार आताच्या पिढीतील युवकांनी अंगीकृत करत राष्ट्र घडविण्यासाठी आपले योगदान द्यावे.
डॉ. परचुरे यांनी या संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक केले तर स्वामीराज भिसे यांनी सूत्रसंचालन केले.
