मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
पिंपरी : मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
त्रिवेणी हॉस्पिटल वाल्हेकरवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस मराठावाडा जनविकास संघांचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी मराठावाडा जनविकास संघांचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते, मराठा सेवा संघांचे गजानन आढाव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक ज्ञानेश्वर लोभे, शहर उपाध्यक्ष संजय जाधव, बीएसपीचे महेश कांबळे, राजेंद्र पवार, तसेच छावा संघटनेचे गणेश सरकटे आदी उपस्थित होते.
त्रिवेणी हॉस्पिटलचे संचालक डॉ. मोहन पवार व डॉ. अश्विनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अदिती कुलकर्णी, डॉ. सदाशिव देशपांडे यांच्या अधिपत्याखाली मोफत आरोग्य शिबीर पुढील तीन दिवस त्रिवेणी हॉस्पिटल वाल्हेकरवाडी येथे सुरु राहणार आहे. या शिबिरामध्ये महिलांसंबंधित सर्व आजार व उपचार करून संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाच लाख रुपयापर्यंत शस्त्रक्रियेचा खर्च करण्यात येणार आहे, असे सतीश काळे यांनी सांगितले.
संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते म्हणाले, सर्वसामान्य गरजू नागरिकांपर्यंत या शिबिराचा हेतू पोहोचला पाहिजे, तसेच यातून सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांचा फायदा व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. मराठा सेवा संघांचे गजानन आढाव यांनी जिजाऊ यांच्या कार्याला उजाळा दिला आणि आजची प्रत्येक स्त्री ही उद्याची जिजाऊ झाली पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या.
