उदगीरच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे भारत सासणे यांना संमेलनाचे निमंत्रण
पुणे : उदगीर येथे होत असलेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कथाकार, साहित्यिक भारत सासणे यांना संमेलनाचे आज निमंत्रण देण्यात आले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातर्फे उदगीर येथे 22, 23 व 24 एप्रिल 2022 रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. निमंत्रक संस्था महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, उदगीरचे अध्यक्ष बसवराज पाटील-नागराळकर यांनी सासणे यांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन संमेलनाचे निमंत्रण आणि अभिनंदन करणारे पत्र दिले. या वेळी मएसोचे उपाध्यक्ष आणि मसापच्या उदगीर शोखचे अध्यक्ष रामचंद्र तिरूके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, उद्योजक रमेश अंबरखाने, दिनेश सास्तुरकर, मल्लिकार्जुन मानकरी, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुरसुडकर, रसुल पठाण, सुधाकर वायचाळकर, विनोद मठपती, राजेंद्र कोरे, प्रा. डॉ. गौरव जेवळीकर आदी उपस्थित होते.
बसवराज पाटील-नागराळकर म्हणाले, लातूर जिल्ह्यात होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन असून आयोजक म्हणून आम्हाला आणि स्थानिकांना संमेलनाविषयी उत्सुकता आहे. हे संमेलन केवळ उदगीरचे न होता संपूर्ण जिल्ह्याचे व्हावे असा आमचा मानस आहे. उदगीर हा सीमावर्ती भाग असल्याने या परिसरात मराठीसह कन्नड, उर्दू आणि तेलगू भाषा बोलल्या जातात. या संमेलनात चारही भाषांचा सन्मान होईल, या दृष्टीने कार्यक्रमांची आखणी करण्यात येणार आहे. उदयगिरी महाविद्यालयाला 60 वर्षे पूर्ण होत असल्याने आयोजनाची संधी मिळावी, अशी विनंती महामंडळाकडे करण्यात आली होती. ही विनंती महामंडळाकडून मान्य करण्यात आली. याचा आम्हाला आनंद आहे. सीमावर्ती भाग असला तरी उदगीर परिसरात भाषावाद नाही. आमच्या महाविद्यालयात कन्नड, उर्दू, तेलगू भाषा शिकविल्या जातात, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. मान्यवर लेखकांबरोबचर नवोदित साहित्यिकांचा संमेलनात सहभाग असेल या दृष्टीने संमेलनाची आखणी सुरू आहे.
सासणे यांच्याविषयी बोलताना बसवराज पाटील-नागराळकर म्हणाले, सासणे यांचा जन्म मराठवाड्यातील असल्याने मराठवाड्यातील मातीशी नाते असलेली व्यक्ती अध्यक्ष म्हणून लाभली, याचा आम्हाला रास्त अभिमान आहे.
सासणे यांना दिलेल्या पत्रातील आशय असा, 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आपली एकमताने निवड झाली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. वाङ्मयाच्या विविध प्रकारातील आपण केलेल्या विपूल व अक्षर लेखनामुळे मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. आपल्यासारख्या प्रतिभासंपन्न लेखकाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान प्राप्त झाला, ही माय-मराठीवर प्रेम करणार्या अनंत रसिक वाचकांच्या दृष्टीने आनंद आणि अभिमानाची बाब आहे.
फोटो ओळ : भारत सासणे यांना उदगीर येथे होत असलेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण देताना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, उदगीरचे अध्यक्ष बसवराज पाटील-नागराळकर व इतर पदाधिकारी.
