कस्तुरबा वसाहतीचा ड्रेनेज लाईन निधी कुणी पळवला?
नगरसेवकांच्या दगाबाजीचा निषेध!
पुणे : वॉर्ड स्थरीय निधीचे इतर प्रभागात वर्गीकरण करून जनतेच्या प्रतिनिधी म्हणून भाजपच्या नगरसेवक राजश्री काळे यांनी जनतेशी दगाबाजी केली आहे, असे म्हणत काल सायंकाळी कस्तुरबा वसाहत, औंध रोड येथील नागरिकांनी आम आदमी पार्टीच्या पुढाकाराने नगरसेवकांचा जाहीर निषेध केला.

स्थायी समिती ठराव १५५२ , दिनांक १/१२/२०२१ व २३ डिसें रोजीची सर्व साधारणसभा मान्यता ( प्रभाग 7 ब , बजेट कोड झेड इ १६ बी १०२/एस डी २ -१५३७ , पान ६४ ) कस्तुरबा वसाहत, प्रभाग ७, येथे ड्रेनेज लाईन टाकणे याच्या निधीचे वर्गीकरण प्रभाग ३० येथे करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका राजश्री काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग सात साठीचा विकासनिधी दत्तवाडी येथे वर्ग केला आहे. प्रभागात अनेक समस्या असताना विकासनिधी वर्ग केल्यामुळे स्थानिक जनता रोष निर्माण झाला आहे, असे यावेळेस आप शिवाजीनगर समितीचे स्थानिक सदस्य दिनेश चौधरी यांनी सांगितले.
बाहेरच्या प्रभागात वर्गीकरण ही तर नगरसेविकेची जनतेशी दगाबाजी आहे, असे आमचे मत आहे तसेच असे निधीचे वर्गीकरण चुकीचा पायंडा पडण्यास कारणीभूत ठरेल. प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकानेच जर जनतेच्या मागण्या नाकारत निधी इतरत्र वळवला तर जनतेने आपल्या समस्या कुणामार्फत सोडवायच्या असा महत्वाचा प्रश्न यातून उभा रहात आहे असे आप चे जिल्हा संयोजक मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
सदरचे वर्गीकरण हे कस्तुरबा वसाहत येथील स्थानिक नागरिकांवर अन्याय करणारे असून त्याबाबत जनतेच्या भावना तीव्र आहेत. सदरच्या कामाची तातडीची गरज असून हे वर्गीकरण महानगरपालिका आयुक्तांनी हस्तक्षेप करावा असे आवाहन आप चे शिवाजीनगर संयोजक सतीश यादव यांनी केले.
स्थानिक लोकं ठेकेदारास दमदाटी करतात, बॅनर लावू देत नाहीत आदी आरोप भाजप नगरसेवक राजश्री काळे यांनी जाहीरपणे वर्तमानपत्रातून केले होते. त्यावर तीव्र प्रतिक्रिया देत आम्हाला त्यांनी पाच वर्षात तोंडही दाखवले नाही असे सांगितले. यावेळेस पैसे देवून , पिशव्या वाटप करून मतदार म्हणून आम्हाला विकत घेवू शकणार नाही असे मंगलताई चौधरी व इतर महिलांनी सांगितले .
नगरसेवक दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आप ची स्थानिक शाखेच्या वतीने आम्ही करीत आहोत असे आपचे वार्ड अध्यक्ष विकास लोंढे यांनी सांगितले.
तुषार कासार यांनी आप च्या दिल्लीतील कामाची माहिती या वेळेस दिली. आकाश मुनियन, विकास चव्हाण, हरीश वाल्मिकी, विमल सहानी , कृष्णा चाव्हाटे , जालिंदर मिसळे, सुरज अडागळे, दीपक सोंडे, ईशान मिसळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
