Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

कोरोना काळात पुण्याचे महापौर, स्थायी समिती प्रमुख, मनपा आयुक्त निघाले गुजरात दौऱ्यावर?

दौरा रद्द करावा आपची मागणी

पुणे : पुणे शहरात कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. तिसरी लाट सुरु झाली आहे. ओमिक्रोनच्या रुग्णांची पुण्यातील संख्या खूप वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रशासन सज्ज असायला हवे. अशा वेळी शासकीय वायफळ खर्च टाळून सर्व संसाधने ही कोरोना विरुद्धच्या लढाईत वापरली गेली पाहिजेत अशी अपेक्षा असताना पुण्याचे महापौर, स्थायी समिती प्रमुख, मनपा आयुक्त, मनपा अतिरिक्त आयुक्त मात्र गुजरात दौऱ्यावर निघाले असल्याची चर्चा सध्या महापालिकेत सुरू आहे.

आम आदमी पक्षाला मिळालेल्या माहितीनुसार पुण्याचे महापौर, स्थायी समिती प्रमुख, मनपा आयुक्त, मनपा अतिरिक्त आयुक्त, मनपाच्या विविध विभागांचे प्रमुख आणि काही मोजके पत्रकार असे सुमारे ३० ते ३५ जणांचे पथक गुजरात दौऱ्यावर निघाले असल्याची बाब समोर आली आहे. त्यासाठी मनपाच्या पैशाने विमान तिकिटे बुक केल्याची बाब आम्हाला समजली आहे. हे जर खरे असेल तर आम आदमी पक्षाचा या दौऱ्याला जोरदार विरोध आहे. पुणे मनपातील भाजपचा कार्यकाळ संपायला अवघा महिनाभर राहिला असताना, कोरोनाची तिसरी लाट असताना असे दौरे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. सदर दौरा रद्द करावा, ही आपची मागणी आहे.

पुणे मनपाच्या तिजोरीत पुरेसे पैसे नसताना, पैशांसाठी मनपाच्या amenity spaces, flats विकायला काढली असताना आणि कोरोनाची तिसऱ्या लाटेची तलवार डोक्यावर टांगती असताना महापौर, स्थायी समिती प्रमुख, मनपा आयुक्त, मनपा अतिरिक्त आयुक्त, मनपाच्या विविध विभागांचे प्रमुख आणि काही मोजके मर्जीतील पत्रकार असा लवाजमा घेऊन दौरे आखणे म्हणजे पुणेकर जनतेच्या कराच्या पैशाची उधळपट्टी आहे. तसेच हे बेजबाबदारपणाचे मोठे उदाहरण आहे. तरी याबाबत स्पष्टीकरण द्यावे आणि ही बाब खरी असल्यास हा गुजरात दौरा रद्द करावा आणि पुणेकर जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवावी, ही आम आदमी पक्षाची मागणी आहे.

Leave a Reply