Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

‘स्वरपर्व’ कार्यक्रमात तरुण कलाकारांनी जिंकली रसिक श्रोत्यांची मने

पुणे : आश्वासक व नव्या दमाच्या स्वरांनी सजलेली नवीन वर्षाच्या पहिल्याच रविवारची संध्याकाळ पुणेकरांनी अनुभवली… निमित्त होते पुण्यातील तालानुभूती फाउंडेशन तर्फे आयोजित ‘स्वरपर्व’ या सांगीतिक कार्यक्रमाचे. मयूर कॉलनी येथील बालशिक्षण मंदिर शाळेच्या आवारातील एमईएस सभागृहात सदर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात सहभागी नव्या दमाच्या आश्वासक कलाकारांनी आपण अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे पुढे नेवू शकतो, याची झलक उपस्थितांना दाखविली. रसिक श्रोत्यांनीही या कलाकारांना भरभरून दाद दिली.
रोहन बिल्डर्सचे संचालक अभिषेक भटेवरा, प्रसिद्ध तबलावादक पं रामदास पळसुले, श्रीनिवास जोशी, राजस उपाध्ये, तालानुभूती फाउंडेशनचे संस्थापक व प्रसिद्ध तबलावादक रोहित मुजुमदार, सचिव सुधीर दर्भे, विश्वस्त कैलास देवधर, खजिनदार मृणालिनी मुजुमदार आदी या वेळी उपस्थित होते.

उदयोन्मुख व प्रतिथयश कलाकारांचा कलाविष्कार रसिकांना एकाच व्यासपीठावर अनुभवता यावा या उद्देशाने रोहित मुजुमदार यांनी ‘स्वरपर्व’ हे व्यासपीठ तयार केले असून, यंदाच्या कार्यक्रमात तरुण आश्वासक कलाकारांवर भर देत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील सर्व प्रमुख आणि साथसंगत करणा-या कलाकारांचे सरासरी वय हे २५ वर्षे इतके आहे. त्यामुळे सादरीकरणादरम्यान एक वेगळीच उर्जा कार्यक्रमस्थळी अनुभवायला मिळाली.

कार्यक्रमाची सुरुवात किराणा घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे १८ वर्षीय नातू व गायक श्रीनिवास जोशी यांचे सुपुत्र विराज जोशी यांच्या गायनाने झाली. २०२२ या नवीन वर्षातील हा आपला पहिलाच कार्यक्रम असल्याचे सांगत राग भीमपलासीने विराजने आपल्या गायनाला सुरुवात केली. यावेळी त्याने विलंबित एकतालातील ‘अब तो बडी बेर…’ ही रचना व ‘ जा जा रे अपने मंदिरवा’ हा दृत ख्याल सादर केला. त्यानंतर त्याने भारतरत्न पं भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेला ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’ हा अभंग गायला. संत नामदेवांनी रचलेल्या ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ या अभांगाने विराजने आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्याला सौरभ क्षिरसागर (तबला), स्वानंद कुलकर्णी (संवादिनी), शिवाजी डाके (तालवाद्य) यांनी साथसंगत केली.

यानंतर भेंडी बाजार मोरादाबाद घराण्याचे २४ वर्षाचे तरुण सतार वादक मेहताब अली नियाझी यांनी आपले सतार वादन सादर केले. मेहताब हे प्रसिद्ध सतार वादक उस्ताद मोहसीन अली खान यांचे सुपुत्र व शिष्य असून त्यांनी वयाच्या ४ थ्या वर्षापासून सतार वादनाचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षी आपला पहिला कलाविष्कार सादर केला. महाराष्ट्रात शास्त्रीय संगीताचे अस्सल श्रोते आहेत. त्यातही पुण्यात पहिल्यांदाच एकल सादरीकरण करत असून याचा आनंद आणि दडपण दोन्ही आहे, असे सांगत मेहताब यांनी राग बागेश्री मधील विलंबित साडे तेरा मात्रा, मध्यलय झपताल व द्रुत तीन या तालांमध्ये गती सादर केल्या. त्यांना आशय कुलकर्णी यांनी सर्मथ अशी तबला साथ केली.

कार्यक्रमाची सांगता घोष घराण्यातील सर्वात तरुण कलाकार ईशान घोष यांच्या एकल तबला वादनाने (तबला सोलो) झाली. ईशान प्रसिद्ध सतार व तबला वादक पंडित नयन घोष यांचे सुपुत्र व शिष्य असून फरुखाबाद घराण्याचे उदयोन्मुख तबला वादक आहेत. ईशान याने विलंबित, मध्यलय व दृत तीन ताल, पेशकार, कायदा, रेला, पारंपारिक गत – तुकडा व पं नयन घोष यांच्या काही रचना सादर केल्या. अभिषेक शिनकर यांनी संवादिनी साथ केली.

Leave a Reply