कोरोनावरील तोंडावाटे घेण्याचे औषध आठवड्याभरात बाजारात
एमक्योर फार्मास्युटिकल्स लिमिटेडची घोषणा
पुणे : एमक्योर फार्मास्युटिकल्स लिमिटेडने (ई.पी.एल.) आज एक मोठी घोषणा केली आहे की, सौम्य कोविड-१९ वर उपचार म्हणून ‘मॉलनुपिरवीर’ या ‘इन्व्हेस्टीगेशनल ओरल अँटी-व्हायरल’ औषधासाठी त्यांना भारतातील ‘ड्रग कंट्रोलर जनरल’कडून इमर्जन्सी युज ऑथोरायझेशन (ईयूए) अनुमती मिळाली आहे. भारतीय बाजारपेठेत ‘लिझुवीरा’ या ब्रँड नावाने ‘मॉलनुपिरवीर’ लॉन्च करण्याची ई.पी.एल.ची योजना असून येत्या आठवड्याभरात हे औषध भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे.
कोविड-१९ वरील उपचारांमध्ये निर्माण होत असलेल्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी असे औषध आवश्यक आहे, ही बाब लक्षात घेऊन ई.पी.एल. आठवड्याभरात लिझुवीरा (मॉलनुपिरवीर) आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. डॉक्टर्स आणि रुग्णांना हे औषध उपलब्ध होण्यात मदत व्हावी यासाठी एक टोल फ्री हेल्पलाईन देखील चालवली जाईल.
भारत आणि १०० पेक्षा जास्त कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी (एलएमआयसी) मॉलनुपिरवीर तयार करण्यासाठी आणि त्याचा पुरवठा करण्यासाठी ई.पी.एल.ने या वर्षीच्या सुरुवातीलाच मर्क शार्प डोम (एम.एस.डी.)सोबत एक लायसेन्सिंग करार केला आहे.
मॉलनुपिरवीर हे तोंडावाटे घेतले जाण्याचे अँटी-व्हायरल आहे जे सार्स-सीओव्ही-२ सह इतर अनेक आरएनए विषाणूंच्या प्रतिकृतींना रोखू शकते. एमएसडी आणि रिजबॅक बायोथेराप्यूटिक्सकडून विकसित केल्या जात असलेल्या या औषधाला युके मेडिसिन्स अँड हेल्थकेयर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी (एमएचआरए) आणि यूएस फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन (यूएस एफडीए) कडून सौम्य ते मध्यम कोविड-१९ जो गंभीर आजार होण्याचा खूप जास्त धोका असतो त्याच्यावर उपचारांसाठी मंजुरी देण्यात आली आहे.
