Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

20व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मोयुका उचिजिमा हिला विजेतेपद

पुणे : डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 20व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत जपानच्या मोयुका उचिजिमाने विजेतेपद संपादन केले. तर, दुहेरीत कझाकस्तानच्या ऍना डॅनिलिना व युक्रेनच्या व्हॅलेरिया स्त्राकोव्हा या जोडीने विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत एकेरीत अंतिम जपानच्या बिगरमानांकीत मोयुका उचिजिमा हिने चौथ्या मानांकित लात्वीयाच्या डायना मार्सिंकेविकाचा 6-2, 7-5 असा पराभव केला. हा सामना 1तास 37मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये मोयुकाने सुरेख सुरुवात करत पाचव्या गेममध्ये डायनाची सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 3-2 अशी आघाडी घेतली. त्यानंतर मोयुकाने डायनाची सातव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-2 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सामन्यात 2-2 अशी बरोबरी असताना डायनाने केलेल्या चुकांचा फायदा घेत मोयुकाने पाचव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात आघाडी घेतली. पण ही आघाडी मोयुकाला फार काळ टिकवता आली नाही. 10व्या गेममध्ये डायनाने आक्रमक खेळ करत मोयुकाची सर्व्हिस भेदली व बरोबरी साधली. पण मोयुकाने तोडीस तोड खेळ करत पुढच्याच गेममध्ये डायनाची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 7-5 असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
 
दुहेरीत अंतिम फेरीत कझाकस्तानच्या ऍना डॅनिलिना हिने युक्रेनच्या व्हॅलेरिया स्त्राकोव्हाच्या साथीत जपानच्या फुना कोजाकी व मिसाकी मत्सुदा या जोडीचा 6-0, 2-6 [10-5] असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
 
स्पर्धेतील एकेरीतील विजेत्या मोयुका उचिजिमाला डॉलर3935 (295536 रुपये) व 65 गुण, तर उपविजेत्या डायना मार्सिंकेविकाला डॉलर2107 (158245रुपये) व 40 गुण अशी पारितोषिके देण्यात आली. दुहेरी गटातील विजेत्या जोडीला डॉलर1437 (1,07932रुपये)   व 65 गुण, तर उपविजेत्या जोडीला डॉलर719 (54000रुपये)  व 40 गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एनइसीसीचे महाव्यवस्थापक बीएसआर शास्त्री, एमएसएलटीएचे मानद सचिव व एआयटीएचे सहसचिव सुंदर अय्यर,एमएसएलटीएचे उपाध्यक्ष विश्वास लोहकरे, डेक्कन जिमखानाचे मानद सचिव गिरीश  इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे, क्लबच्या फायनान्स विभागाचे सचिव मिहीर केळकर, आयटीएफ सुपरवायझर शितल अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading