अधीक्षक अभियंता पुंडलीक थोटवे यांना स्वयंदीप जीवन गौरव पुरस्कार प्रदान
पुणे : स्वयंदीप फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने मुंबई येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता पुंडलीक थोटवे यांना स्वयंदीप सन्मान जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्वयंदीप फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सामाजिक, प्रशासकीय, जलसिंचन क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना “स्वयंदीप सन्मान जीवन गौरव” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या वर्षी या पुरस्कारासाठी थोटवे यांची निवड करण्यात आली होती.
अध्यक्षस्थानी ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस तर प्रमुख पाहुणे म्हणून, पुणे विभागाचे अतिरिक्त महसूल आयुक्त अनिल रामोड, राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, यांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता मिलिंद जीवने, ज्येष्ठ पत्रकार मधू कांबळे, साहित्यिक डॉ. राम वाघमारे व यशदातील अधिकारी डॉ. बबन जोगदंड उपस्थित होते.
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी थोटवे यांना मानपत्र, सन्मानचिन्ह व म. फुले यांची पगडी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमात प्रास्ताविकात स्वयंदीप फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉ. बबन जोगदंड यांनी या पुरस्कारामागची भूमिका मांडली व थोटवे यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी बोलताना श्रीपाल सबनीस यांनी हा पुरस्कार एका सद्विचारी माणसाला देऊन त्यांचा सन्मान केला आहे, असे सांगून लोकशाही मूल्य पेरणारा व डोळस, ध्येयवादी अभियंता असे थोटवे यांचे वर्णन केले.
रामोड यांनी थोटवे यांचे काम अलौकिक स्वरूपाचे असून त्यांनी वंचित घटकातून येऊन जलसंपदासारख्या क्षेत्रात भरीव योगदान देऊन आपल्या कार्याचे वेगळेपण सिद्ध केले आहे, म्हणूनच त त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे असे सांगितले. मधू कांबळे यांनी जलसंपदा क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मौलिक योगदान होते, असे म्हटले. या वेळी डॉ. राम वाघमारे यांनी थोटवे यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
कीर्ती देसाई यांनी स्वागतगीत गायले. सूत्रसंचालन प्रज्ञा कल्याणकर यांनी तर आभार दिलीप पवार यांनी मानले.
