लोकायत नागरी समितीनं मिळवून दिलं लोकांना हक्काचं रेशन
पुणे:नागरिकांनी आपल्या हक्कांसाठी एकत्र येऊन लढलं पाहिजे. ह्या पुढेही जर रेशनचे प्रश्न सोडवण्यासाठी गरज पडल्यास आपण सर्वांनी मिळून आंदोलन करू व अन्नपुरवठा मंत्र्यांपर्यंत मुद्दा घेऊन जाऊ असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे नितीन पवार यांनी मांडले.
निमित्त होते बुधवार दिनांक 22 डिसेंबर रोजी लोकायत नागरी समिती आणि स्थानिक रब्बते मील्लत कमिटी यांनी लोहिया नगर येथे रेशनच्या मुद्द्यावर केलेला अनुभव कथन हा कार्यक्रम. यावेळी कार्यक्रमामध्ये ज्या 17 गरजू कुटुंबांना समितीच्या प्रयत्नांमुळे रेशन सुरू झाले त्यांनी आपले मनोगत मांडले. रेशन सुरू करताना त्यांना काय अडचणी येत होत्या व आता समिती मार्फत कशा पद्धतीने काम झाले ह्या बद्दल लोकांनी सांगितले.
लोकायत नागरी समितीच्या कार्यकर्त्या अॅड. मोनाली अपर्णा यांनी समिती स्थापण करण्यामागची भूमिका सांगितली. तसेच पुण्यातील इतर वस्त्यांमध्ये देखील नागरी समितीचे कामकाज चालू आहे ह्याबद्दल मांडणी केली.
कार्यक्रमात नागरिकांना सहकार्य करणाऱ्या स्थानिक रेशन दुकानदारांचे देखील संविधानाची प्रस्तावना देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात रब्बते मील्लत कमिटी तर्फे रफिक शेख मंचावर उपस्थित होते, तसेच साजिद शेख यांनी कमिटीचे या पुढेही नागरी समितीला सहकार्य असेल असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट संविधानाचे प्रास्ताविक वाचून करण्यात आला.
