वाहतूक दंडातील अवाजवी वाढी विरोधात वाहतूकदार मालक-चालकांचा 23 डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा
पुणे : मोटार वाहन अधिनियम (सुधारणा) अधिनियम 2019 या गोंडस नावाखाली वाहतूक नियम भंगाच्या दंड, तडजोड फी मध्ये केंद्र सरकारने प्रचंड वाढ केली आहे. प्रवासी व माल वाहतूकदार असणार्या टेम्पो, ट्रक, रिक्शा इ. चालक मालकांचे रोजचे उत्पन्नही नाही इतका हजारो रूपयांचा दंड वसूली सुरू झाली आहे. याच्या निषेधार्थ येत्या 23 डिसेंबर रोजी विधानभवन, पुणे येथे वाहतूकदारांचा प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे.
आज पुणे जिल्हा व राज्य स्तरावरील पुण्यातील विविध प्रवासी व माल वाहतूकदार संघटनांची बैठक हमाल भवन इथे पार पडली. यामध्ये विविध संघटनांचे सुमारे 60 पदाधिकारी प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी नवीन वाहतूक अधिनियम व जाचक दंडा विरुद्ध तीव्र संघर्ष करण्याचा निर्णय झाला. त्याची सुरुवात येत्या शुक्रवारी 23 डिसेंबर रोजी विधानभवन,पुणे येथे मोर्चा काढून करण्यात येणार आहे.
या बैठकीला पुणे डिस्ट्रिक्ट मोटर गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशन, टेम्पो पंचायत, रिक्शा पंचायत, पुणे बस ओनर्स असोसिएशन,महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक महासंघ,पुणे जिल्हा दूध वाहतूक महासंघ, पुणे हुंडेकरी असोसिएशन, बघतोय रिक्षावाला मंच,पुणे ऑटो रिक्शा फेडरेशन, भाजप रिक्शा आघाडी,लोकयत,श्री शिवाजी मार्केटयार्ड टेम्पो पंचायत या संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधींचा उपस्थित होते.
यावेळी पुढील निर्णय घेण्यात आले. माल व प्रवासी वाहतूकदार कृती समिती स्थापन करावी आणि त्या समितीचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव असतील.समन्वयक म्हणून नितिन पवार काम पाहतील. विधानसभेचे अधिवेशन होणार सुरू असल्याने समितीतर्फे पुण्यातील सर्व आमदारांना आज आणि उद्या या दोन दिवसांमध्ये निवेदन देण्यात येईल. पुण्यातील लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना सुध्दा निवेदन देण्यात येईल.
