नाटक पाहून सकारात्मक ऊर्जा घेऊन जावू या – भारत जाधव
पिंपरी : प्रेक्षकांनी कोरोना काळातील नैराश्य बाजूला ठेवून नाटक पहायला यावे. नाटक पाहून सकारात्मक ऊर्जा घेऊन जावू या. भाऊसाहेब भोईर यांनी माझा आचार्य अत्रे पुरस्कार देऊन गौरव केला आहे आणि त्याच ठिकाणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात मला आचार्य अत्रेंचे नाटक करायची संधी मिळणे हा दुग्धशर्करा योग आहे असे प्रतिपादन नाट्य कलाकार भरत जाधव यांनी केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित केलेल्या नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी भरत जाधव बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ रंगकर्मी नंदकिशोर कपोते, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादी युवक प्रदेश कार्याध्यक्ष रवीकांत वरपे, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, तळेगाव दाभाढे शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, शिरूर शाखेच्या अध्यक्षा दिपालीताई (माई) शेळके, कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, दौंड शाखेचे अध्यक्ष प्रमोद कांबळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, राष्ट्रवादी युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप आदी उपस्थित होते. या नाट्य महोत्सवाअंतर्गत आचार्य अत्रे लिखित ‘मोरुची मावशी’ आणि संकर्षण कर्हाडे लिखित व अभिनेते प्रसाद ओक दिग्दर्शित ‘तू म्हणशील तसे’ या नाटकाचा प्रयोग सादर झाला.
भरत जाधव म्हणाले की, सलग 25 वर्षे नाट्य परिषदेची संस्था चालविणे सोपे काम नाही. कोरोनामुळे सर्वच व्यवसाय अडचणीत आले होते. तसेच नाट्य व्यवसाय, बॅक स्टेज आर्टिस्ट अडचणीत आले होते. आता आम्ही गोव्यासह महाराष्ट्राचा दौरा करत आहोत. सर्वत्र प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. नाटकातून सकारात्मक ऊर्जा घेऊन पुढे जावे, असेही आवाहन भरत जाधव यांनी केले.

या प्रयोगांआधी विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव भरत जाधव, संकर्षण कर्हाडे आणि मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये पुणे, तळेगांव दाभाडे, शिरुर, दोंड, पुणे व मुंबई येथील नाट्यपरिषद शाखा, पिंपरी चिंचवड शाखेचे कार्यकारिणी सदस्य यांचाही समावेश होता.
भाऊसाहेब भोईर यांनी प्रास्ताविक केले. संकर्षण कऱ्हाडे यांनी ही प्रेक्षकांशी संवाद साधला.
