पुस्तकांमध्ये माणसाला बदलवण्याची ताकद – डॉ. आनंद नाडकर्णी
पुणे: ज्याप्रमाणे प्रेम माणसाला संयम, स्वयंशिस्त शिकवते त्याप्रमाणे पुस्तकेही शिकवतात. एकदा पुस्तकांशी नाते जुळले की त्यामुळे तुमचे वर्तन, भावना आणि विचार बदलतात. एखादे पुस्तक वाचल्याने आयुष्य बदलले अशी अनेक उदाहरणे तुम्हाला पहायला मिळतील. ख-या अर्थाने पुस्तकांमध्ये माणसाला बदलवण्याची ताकद आहे, असे प्रतिपादन विख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.
मनोविकास प्रकाशनच्या वतीने दीपा देशमुख लिहित ‘जग बदलणारे ग्रंथ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नवी पेठ, गांजवे चौक येथील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडला. डॉ. नाडकर्णी यांच्या हस्ते व ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुस्तकाचे प्रकाशन झाले. मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर, आशिष पाटकर या वेळी उपस्थित होते. ‘जग बदलणारे ग्रंथ’ या पुस्तकात धर्म, अर्थ, काम, गणित, विज्ञान, तत्त्वज्ञान अशा अनेक शाखांमधील जगभरातील ५० ग्रंथाविषयी भाष्य करण्यात आले आहे.
याविषयी बोलताना डॉ. नाडकर्णी म्हणाले, “पुस्तक आणि वाचक हे नाते निरपेक्ष भावना असलेले नाते आहे. ज्या वेळी पुस्तक तयार झाले, त्याच वेळी वाचक तयार झाला व वाचन नावाचा आयाम संस्कृतीला मिळाला. वाचन हे अंत:श्रवणासारखेच आहे. वाचक, पुस्तक यांमध्ये ध्यास आणि प्रेम असायला हवे.”
पुस्तकांचा प्रभाव हा आज कमी झाला आहे असे मला वाट नाही, असे सांगत डॉ. नाडकर्णी पुढे म्हणाले, “हॅरी पॉटर या पुस्तकाने विक्रीचे उच्चांक तर मोडलेच त्याबरोबर आपला वाचकवर्ग देखील तयार केला. हे पुस्तक केवळ वाचले गेले नाही तर यावर अनेकांनी पुस्तके सुद्धा लिहिली व एक नवी वाचन संस्कृती तयार झाली असे आपल्याला म्हणता येईल.”
दीपा देशमुख लिखित ‘जग बदलवणारे ग्रंथ’ हे पुस्तक वाचल्यावर त्यात दिलेले ग्रंथ पुन्हा एकदा वाचावेत असा मोह होतो. इतकेच नव्हे तर ते वाचल्यानंतर आधी समोर न आलेला एक वेगळा दृष्टीकोन आपल्या समोर येतो असे सांगत प्रा. हरी नरके म्हणाले, “अनेकदा कोणी कोणाचे फारसे कौतुक करत नाही. पण कौतुक केले की आपले नुकसान होत नाही हे लक्षात घेत चांगल्या पुस्तकांचे तोंड भरून कौतुक करा, ते पुस्तक जास्तीत जास्त वाचकांनी वाचावे यासाठी पुस्तकांचे हौशी प्रचारक व्हा.”
मी पुस्तके वाचत नाही, अशी बढाई अनेकजण मारतात. पण तुम्ही पुस्तके वाचत नाही हे तुमच्यातील एक वैगुण्य आहे हे अशा लोकांच्या लक्षात येत नाही, अशी खंत प्रा. नरके यांनी बोलून दाखविली.
अनेकदा आजूबाजूची परिस्थिती, घटना, अनुभव यांमुळे निराश, उद्विग्न व्हायला होतं. मात्र घरातील किमान एक हजार पुस्तक वाचायची राहिली आहेत, हे लक्षात आल्यावर ती लवकरात लवकर वाचली पाहिजेत, ती वाचणं हे आपलं कर्तव्य आहे, हा विचार मनावरची सारी मळभ दूर करून टाकतो, असेही प्रा. नरके यांनी सांगितले.
जगावर परिणाम केलेल्या ग्रंथांबद्दल लिहायचे म्हटल्यावर अगदी सुरुवातीपासून दडपण होते, अनेकदा हे आपल्याकडून होईल का असा प्रश्न पडायचा, मात्र आजूबाजूच्या अनेक मित्रमैत्रिणींनी तू हे करू शकतेस असा विश्वास दिला. याच बळावर हे पुस्तक पूर्ण झाले. एखाद्या ग्रंथाची केवळ माहिती न देता लेखकाची माहिती, लेखकाचे विचार, त्या काळची परिस्थिती आणि ग्रंथाचे महत्त्व अशा सर्वांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला असल्याचे दीपा देशमुख यांनी सांगितले.
अरविंद पाटकर यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. ज्योती शिरोडकर यांनी सूत्रसंचलन केले
