मानवमुक्तीचा लढा संपत नाही तोपर्यंत स्वातंत्र्याची चळवळ चालू राहील – भारत पाटणकर
पुणे: संविधान सांगते विविध प्रकारच स्वातंत्र्य कमवावं लागेल ती प्रक्रिया निरंतर चालू आहे. पहिला स्वातंत्र्य योद्धा गौतम बुद्ध होता.ज्याने दुःख मुक्तीचे,शोषण मुक्तीचे, मानव मुक्तीचे स्वप्न पाहिले.त्यासाठीचा पर्याय मांडला. हा पर्याय प्रत्येकाने आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहायला सांगितले.आणि तो मान्य नसल्यास न स्वीकारण्याचे मुभा ठेवून व्यक्ती स्वातंत्र्याची जाणीव करून दिली. त्याचा विस्तार नन्तर कबीर,फुले आंबेडकरांनी केला. यातील 15 ऑगस्ट 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य व हा स्वातंत्र्यलढा हा स्वातंत्र्याचा एक टप्पा होता.स्वातंत्र्य नन्तर त्यात निर्माण झालेल्या मूल्यांचा अविष्कार भारतीय राज्यघटनेत झाला.पण संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आवश्यक अनेक कलमांचा समावेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्य घटनेत करू शकले नाहीत.म्हणून संपूर्ण मानव मुक्ती होईपर्यंत आणि बाबासाहेब सामिल करू न शकलेल्या कलमांचा संविधानात अंतर्भाव होईपर्यंत स्वातंत्र्य लढा सुरूच ठेवला पाहिजे.असे ठाम प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी येथे केले.
देशाच्या स्वातंत्र्याचा 75 उत्सवाचा आज प्रारंभ झाला. त्याच्या मुख्य कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. पंडित रामप्रसाद बिसमिल व अशफाकुल्लाह खान यांच्या हौताम्यदिनाचे औचित्य साधून त्यासाठी आज राष्ट्रीय एकात्मता मंच उभारण्यात आला होता. महात्मा फुले पेठ येथिल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात या मंचावर जरा याद करो कुर्बानी हा संकल्प मेळावा संपन्न झाला.यावेळी दलित पँथरचे अर्जुन डांगळे, माजी न्यायमूर्ती न्या. बी. जी. कोळसे पाटील , अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे नितीन पवार, राष्ट्र सेवा दलाचे अर्जुन कोकाटे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कॉ. धनाजी गुरव, लोकायतचे नीरज जैन अशा विविध संघटनांचे तसेच शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे राज्य उपाध्यक्ष मोहन जोशी राज्य सरचिटणीस अभय छाजेड राष्ट्रवादीचे राज्य प्रवक्ते विकास लवांडे उपस्थित होते.
अल्पसंख्यकांना लक्ष करणाऱ्या सध्याच्या वातावरणात इतिहासातले हिंदु मुस्लिम एकीचे दाखले पुनर्जीवित करावे लागतील. हिंदु मुस्लिम समाजातील सद्याच्या होत असलेल्या धार्मिक विचारांच्या चौकटीतून आपण बाहेर पडले तरच म्हणून आपण विचार करू शकू . असे परखड मत जेष्ठ विचारवंत राम पुनियानी यांनी व्यक्त केले.
