चंद्रशेखर आझाद यांची 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथे सभा
विजयास्तंभास 200 वर्ष पूर्ण झाल्याने विशेष महासभा
पुणे : येत्या १ जनेवारी २०२२ ला विजय स्तंभाला दोनशे वर्ष पूर्ण होत आहेत. या द्विशताब्दीचे औचित्य साधून आजाद समाज पार्टीच्या वतीने भीमा कोरेगांव येथे अभिवादन महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस पहिल्यांदाच आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रावण उर्फ चंद्रशेखर आजाद पुण्यात येणार आहेत. यावेळी राहुल प्रधान उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती पक्षाचे युवाध्यक्ष अभिजित गायकवाड यांनी दिली.

१ जानेवारी १८१८ रोजी इंग्रज, महार रेजिमेंट आणि पेशवे यांच्या सैन्यात भीमा कोरेगांव जवळ भीमा नदीकाठी लढाई झाली होती. यात महार बटालियनच्या ५०० सैनिकांनी पेशव्यांच्या २८ हजार सैनिकांचा पाडाव करून विजय मिळवला होता. त्यात महार रेजिमेंटच्या अनेक सैनिकांना वीरमरण आलं. या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून इंग्रजांनी १८२२ मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी विजयस्तंभ उभारला आहे. या वर्षी विजयस्तंभ उभारुन दोनशे वर्ष पूर्ण होत आहेत. या द्विशताब्दी चे औचित्य साधून विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी व २०२२ मधे पुणे महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेउन आजाद समाज पार्टी च्या वतीने भीमा कोरेगांव अभिवादन महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यात पहिल्यांदाच मौजे पेरणे विजयस्तंभ इथे आजाद समाज पार्टी ची ज़ाहिर सभा होणार आहे. या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आजाद (रावण) व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुल प्रधान (पँथर) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच सभेस अॅड. तौसीफ शेख, अॅड. क्रांति सहाणे, फिरोज मुल्ला हे देखिल उपस्थित राहणार आहेत. सभेची पूर्व तयारी जिल्हाध्यक्ष रवि राखपसरे, दीपक पंचमुख, भीमराव कांबळे, रफिक शेख व सर्व पदाधिकारी करत आहेत, अशी माहिती पक्षाचे युवाध्यक्ष अभिजित गायकवाड यांनी पत्रकारद्वारे दिली आहे.
