प्रत्येक महिलेला आपलं “माहेर” वाटावे असे काम राज्य महिला आयोग करेल – रुपाली चाकणकर
पुणे : राज्य महिला आयोग हे राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक महिलेला आपलं “माहेर” वाटावं अशा पद्धतीने काम करेल असा विश्वास राज्य महिला आयोगाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला. येरवडा येथे माळी सेवा संघाच्या प्रथम वर्धापन दिन सोहळयानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. प्रत्येक महिलेला सन्मानाने जगता यावे यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने काम सुरू आहे. महिलांवरील अत्याचारासह त्यांची सुरक्षितता तसेच विविध प्रश्नांसाठी राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून काम केले जाईल अशी ग्वाही चाकणकर यांनी यावेळी दिली.
यावेळी माळी सेवा संघाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त कै. पारूबाई बोराटे यांच्या स्मरणार्थ समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर वैशाली बनकर, डॉ. वैशाली घोडेकर, संत शिरोमणी सावता महाराज यांचे वंशज रमेश महाराज वसेकर, बबन बोराटे, माळी सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय माळी, उपाध्यक्ष बालाजी माळी, ज्ञानदेव जाधव, सचिव सचिन राऊत, उर्मिलाताई भुजबळ, मुरलीधर भुजबळ, महेश गोरे, नानासाहेब ननावरे बालाजी वहील, ऍड. नितीन राजगुरू यांच्यासह राज्यभरातील जिल्हा तालुका व विभागीय पदाधिकारी उपस्थित होते.
माळी सेवा संघाच्या माध्यमातून राज्यभरातील समाज बांधवांचे संघटना उभारण्यात आली असून समाजाच्या प्रगतीसाठी संघटनेच्या माध्यमातून कार्य सुरू असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय माळी यांनी दिली. या कार्यक्रमात यशस्वी उद्योजक म्हणून राजेंद्र गिरमे यांच्यासह पोलीस उपअधीक्षक अर्चना फुलसुंदर, सेवानिवृत्त न्यायाधीश गोविंदराव शिरवाडकर, सरपंच पोपटराव बोराटे यांना समाजभूषण तर डॉ. नितीन शिंदे यांना कोव्हीडयोद्धा, आयपीएल क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड यांना युवा समाजरत्न या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
