सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दहा हजार ‘आरटीपीसीआर’ चाचण्यांचा टप्पा पूर्ण
पुणे : कोव्हिड महामारीच्या काळात विद्यापीठाने पुढाकार घेत सुरू केलेल्या ‘कोव्हिड सॅम्पल टेस्टिंग’ ने नुकताच दहा हजार चाचण्यांचा टप्पा पार केला आहे. १२०-१३० स्वयंसेवक, विद्यापीठातील प्राध्यापक यांच्या मदतीने कोणत्याही आर्थिक लाभाशिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हा प्रकल्प राबवत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असणाऱ्या ‘कोविड सॅम्पल टेस्टिंग’ ला विद्यापीठाच्या आण्विक निदान संशोधन केंद्रात २७ मे २०२१ पासून सुरुवात करण्यात आली. यानुसार सरकारी हॉस्पिटलमधून येणाऱ्या सॅम्पलची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात येत आहे. ‘आयसर’ मधून प्रशिक्षण घेऊन आलेले विद्यापीठातील दहा प्राध्यापक व विविध महाविद्यालय व विद्यापीठातील विद्यार्थी स्वयंसेवक यांच्या एकत्रित कामातून आजवर दहा हजार ‘सॅम्पल टेस्टिंग’ पूर्ण झाले आहे.
याबाबत माहिती देताना आण्विक निदान संशोधन केंद्राच्या नोडल अधिकारी करिश्मा परदेसी म्हणाल्या, उभारणीसाठी लागणारी सर्वोतोपरी मदत कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी उपलब्ध करून दिल्यानेच इतक्या कमी कालावधीत आम्ही १० हजारांचा टप्पा पार करू शकलो. या कामाचे प्रशिक्षण व अनुभव या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिळतो आहे. याविषयी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याच्याही आम्ही विचारात आहोत.
विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा यात मोठा वाटा
“कोव्हिड काळातील ‘सॅम्पल टेस्टिंग’ चे काम हे केवळ मर्यादित कालावधीसाठी न ठेवता आजही अव्याहतपणे सुरू आहे. विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा यात मोठा वाटा आहे.”
– डॉ. नितीन करमळकर (कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
