Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

सामान्यांना बळ देण्याचे काम सामाजिक संस्थांनी केले – डॉ.अविनाश भोंडवे

पुणे : भारताला भविष्यात जर काही चांगले मिळणार असेल, तर ते सातत्याने समाजासाठी धडपडणा-या युवकांकडून मिळणार आहे. कोविड काळात आणि आताच्या ओमायक्रॉनची भिती असलेल्या काळात राजकीय पक्षांनी फक्त एकमेकांची उणी-दुणी काढली. डॉक्टरांनी रुग्णांना जगविण्याचे काम केले. मात्र, सामान्यांना बळ देत जगण्याचे सामर्थ्य मिळवून देण्याचे काम सामाजिक संस्थांनी केले आहे, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी केले.

जनशक्ती विकास संघातर्फे वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे समाजभूषण पुरस्कार २०२१ प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अविनाश ताकवले होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षणमहर्षी पी.ए.इनामदार, डॉ.तानाजी दबडे, सुरेश गुप्ता, संघाचे प्रदेश अध्यक्ष रहीम शेख, महिला प्रदेश अध्यक्ष सारिका खान, युवक प्रदेश अध्यक्ष सुफियान खान, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता फिरोज मुल्ला, युवक उपाध्यक्ष अनिल तिवारी, उपाध्यक्ष सुशांत गायकवाड, चेतन राख, माऊली साळुंखे, समीर शेख, नासिर शेख आदी उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या आबेदा इनामदार, डॉ.एस.एन.पठाण, अ‍ॅड.बिलाल शेख, डॉ.शोभनाथ यादव आदींना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ असे सन्मानाचे स्वरुप होते.

पी.ए.इनामदार म्हणाले, स्वातंत्र्यानंतर सन १९५० ला शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात तेवढया सुविधा नव्हत्या. राज्यघटनेमुळे यामध्ये बदल झाले आणि राज्यघटनेच्या अंमलबजावणीचे फलित असे की, प्रत्येक १ किमी व १ शाळा देखील सुरु झाली. आज शिक्षण मिळत आहे, मात्र बदललेल्या परिस्थितीतील अडचणींवर मात करणे देखील आपण प्रत्येकाने शिकायला हवे.

प्राचार्य अविनाश ताकवले म्हणाले, शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता, संरक्षण आणि वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात या मागील दोन वर्षांच्या कोविड काळात अनेकांनी मोलाचे कार्य केले. समाजाप्रती आपले असलेले ॠण व्यक्त करणे म्हणजे काय, हे या व्यक्तिंनी आपल्याला दाखवून दिले आहे. कोविडच्या प्राद्रुभार्वामुळे जग पाच ते दहा वर्षे मागे गेले असे म्हटले जाते. मात्र, जर, हे कोविड काळात काम करणारे योद्धे नसते, तर जग वीस ते तीस वर्षे मागे गेले असते. जीवन खूप सुंदर आणि त्याला आपण अधिक सुंदर बनवायला हवे, असा संदेश सामाजिक संस्थांकडून या सामाजिक कार्यकर्त्यांकडून दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. सारिका खान यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading