Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNETECHNOLOGY

‘बांगलादेश मुक्तीसंग्रामातील शौर्यगाथा’ ऑडिओ बुक रुपात मोफत ऐका

पुणे : यंदाचे वर्ष 1971 च्या बांगलादेश मुक्तीसंग्राम सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. ही लढाई भारतासाठी नव्हती. यामध्ये पाकिस्तान अर्धा झाला आणि बांगलादेश या नव्या देशाचा जन्म झाला. आपल्या सैनिकांचे अतुलनीय शौर्य या युद्धात पहायला मिळाले. या युद्धातील भारतीय सैनिकांच्या शौर्याची आठवण म्हणून येत्या 16 डिसेंबरला देशभर विजय दिवस साजरा होत आहे. मात्र, या घटनेला पन्नास वर्षे उलटूनही आजच्या तरुण पिढीला एकत्रितपणे या युद्धाबद्दलची माहिती उपलब्ध नाहीये. याची दखल घेऊन झंकार पब्लिशिंग स्टुडीओ, पुणेच्या वतीने ‘१९७१ युद्धातील शौर्यगाथा’ अर्थात ‘बांगलादेश मुक्तीसंग्रामातील शौर्यगाथा’ या ऑडिओ बुक सिरीजच्या स्वरूपात घेऊन आले आहेत. 

रिटायर्ड मेजर जनरल नितीन गडकरी यांची ही मूळ संकल्पना. झंकार पब्लिशिंग स्टुडीओ पुणेने यासाठी पुढाकार घेतला. याबद्दल अधिक माहिती सांगताना झंकार स्टुडिओचे संचालक सत्यजित पंगू म्हणाले, रिटायर्ड मेजर जनरल नितीन गडकरी यांनी या ऑडिओ बुकची संकल्पना मांडल्यानंतर या युद्धातील सैन्याच्या अलौकिक कामगिरीला आदरांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने आम्ही या प्रोजेक्टवर काम करायला सुरूवात केली. 1971 साली घडलेल्या राजकीय घडामोडींचा अभ्यास, देशाच्या दोन सीमेवरती पाकिस्तानने आपल्यावर कसं युद्ध लादलं आणि ते आपण कसं उलटून लावलं, आपल्या लष्कराच्या महत्त्वाच्या स्ट्रॅटेजी काय होत्या?, या १३ दिवस चाललेल्या घनघोर युद्धातील महत्त्वाच्या लढाया कोणत्या?, पूर्व आणि पश्चिम दोन्ही सीमेवरती झालेल्या महत्त्वाच्या लढाया कोणत्या? आणि शेवटी पाकिस्तानी सैन्य शरण कसं आलं या सर्व मुद्द्यांना एकत्र करून मराठी आणि इंग्रजी मधून ऑडिओ सिरीज तयार करायच ठरलं.  

त्यानुसार या वर्षी एप्रिल 2021 मध्ये पहिला भाग स्टोरीटेल या ॲप वर रिलीज केला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानुसार दर महिन्याला एक मालिका आणि त्यात एक लढाई कव्हर करायची अशा पद्धतीने हे काम सुरू झालं. आता या मालिकेतील 8 भाग रिलीज झाले असून शेवटचा 9 वा भाग हा येत्या 16 डिसेंबरला प्रदर्शित केला जाणार आहे. या कामामध्ये ब्रिगेडियर जसबीर बावा, कर्नल शेणोय, दीपक दळवी,  युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेले ब्रिगेडियर प्रकाश गोगले, हवाई छत्री मार्फत म्हणजेच पॅराट्रूपर च्या सहाय्याने भारतीय सैन्य बांगलादेश मध्ये उतरलं होतं आणि त्याचा पाकिस्तानने धसका घेतला या ड्रॉप मध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेले कर्नल टेंबे , त्यानंतर आपल्या सैन्याने प्रत्यक्ष रणगाडे मेघना नदीमध्ये घुसवून नदी पार केली होती त्यांत लेफ्टनंट जनरल शम्मी मेहता सहभागी होते आणि युद्धाच्या शेवटी आपली एक पूर्ण बटालियन हेलिकॉप्टर नी म्हणजे हेली लिफ्ट या पद्धतीने नदीच्या पलीकडे उतरवली होती त्याच्यामध्ये विंग कमांडर कृष्णमूर्ती सहभागी होते, या सर्वांनी स्वतःहून मार्गदर्शन देऊ केले. या मार्गदर्शनातून नऊ भागांची अतिशय रंजक आणि अभ्यासपूर्ण अशी ऑडिओ मालिका तयार झाली. 

यामध्ये रवींद्र अभ्यंकर ,आद्वैता उमराणीकर ,रोहित इनामदार, उर्मी निवर्गी, स्वतः मेजर जनरल नितीन गडकरी ,जसबीर बावा यांनी लिखाण करायला मदत केली आणि बालगंधर्व पुरस्कार विजेते संजय डोळे ,वंदना गरगटे ,प्रसिद्ध निवेदक सागर नाईक, दत्ता सरदेशमुख , राजेश दामले , शैलेश म्हापणकर, क्षितिज जहागीरदार अशा अनेक मंडळींनी अभिवाचन केले. सोबत सूरज कदम, सूरज सोळसे, अभिजित दळवी,प्रसाद भारदे, उदय थत्ते क्षितिजा भट, शीतल करंदीकर, दीपश्री करंदीकर , सुयोग देशपांडे, चैताली गाडे यांनी आपापला वाटा उचलला. अमित पाटील यांनी साजेसे संगीत देवून हि मालिका उत्कंठावर्धक केली.

आज, हि ९ भागांची ऑडिओ मालिका,
झंकार स्टुडिओ च्या RSS फीड व्दारे सर्व पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर आणि रेडिओ मराठी तरंग या वेब रेडिओ वर सर्व ९ भाग मोफत ऐकण्यास उपलब्ध आहेत.
Spotify, गुगल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन Storytel आदी पॉडकस्ट प्लॅटफॉर्मवर श्रोत्यांना हे भाग ऐकता येतील. तसेच मराठी रेडिओ तरंग या वेब रेडिओ वरती देखील ही मालिका ऐकता येणार आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading