Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

‘नो हॉंकींग डे’ निमित्त पुण्यात हॉर्न ठेवा एक दिवस बंद

पुणे : लाईफ सेव्हिंग फाऊंडेशन, पुणे पोलीस (वाहतूक शाखा) आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्या वतीने नो हाँकीग डे अर्थात ‘पुण्यात हॉर्न ठेवा एक दिवस बंद’, अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. रविवार, दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता पुण्यातील १० चौकांमध्ये एकाच वेळी नो हाँकीग डे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती लाईफ सेव्हिंग फाऊंडेशनचे देवेंद्र पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे मकरंद टिल्लू, प्रा.पद्माकर पुंडे आदी उपस्थित होते.

रविवार, दि.  १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता टिळक चौक (अलका टॉकीज चौक) येथे मुख्य जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर हे असून प्रमुख पाहुणे पुणे पोलीस वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे, वरिष्ठ क्रीडा समालोचक सुनंदन लेले, एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन प्रा.पद्माकर पुंडे करणार आहेत.

देवेंद्र पाठक म्हणाले, पुण्यात साधारणत: दररोज एक कोटी पेक्षा जास्त वेळा हॉर्न वाजवला जातो व यातील ९० टक्के हॉर्न हे अनावश्यक असतात. या अनावश्यक हॉर्नमुळे त्यांना ब-याचश्या दुष्परिणामांना सामारे जावे लागते, त्यामुळे नो हॉर्न या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोथरुड, विश्रांतवाडी, पाषाण, बाणेर आणि जंगली महाराज रस्ता येथे एकाच वेळी जनजागृती केली जाणार आहे. पुण्यातल्या विविध आय टी कंपनी, हॉटेल्स, मॉल्स, पीएमपी बसेस, विविध सामाजिक संघटना, सोसायटी या सर्वांनाच उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मकरंद टिल्लू म्हणाले, शाळा, हॉस्पिटल अशा ठिकाणी नो हॉर्न विषयी जनजागृती करणारे फलक असतात. पण आपण त्यांना विशेष गांभीर्याने घेत नाही.  सध्या पुणे हे एकमेव असे शहर आहे जिथे वाहनांची संख्या ही लोकसंख्येपेक्षा जास्त आहे, वाढत्या ध्वनिप्रदूषणात हॉर्न चा आवाज प्रमुख कारण आहे. त्याच प्रमाणे पुणेकरांना उच्च रक्तदाब, हदयरोग, मानसिक ताण, चिडचिडेपणा, नैराश्य आणि बहिरेपणा या त्रासांचा देखील सामना करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी नो हॉर्न संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading