Omicron : पुणे शहरातील त्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह
पुणे : शहरात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात असली तरी ओमिक्रॉनच्या शिरकावामुळे संपूर्ण यंत्रणेचे धाबे दणाणले. ओमायक्रॉनच्या संसर्गाचा वेग ‘डेल्टा व्हेरिएंट’पेक्षा पाचपट असल्याने नव्या व्हेरिएंटच्या रूपाने तिसरी लाट येईल का? अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच शहरात पहिला रुग्ण सापडल्याने संसर्गाचा वेग वाढेल का? अशी भीती व्यक्त होत असताना संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने दिलासा व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे ओमिक्रॉनचा शहरात शिरकाव झाला असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
ओमिक्रॉनबाधित व्यक्तीला रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले असून. सध्या त्याला कोणतीही लक्षणे नसून प्रकृती स्थिर आहे. २९ नोव्हेंबरला थोडासा ताप जाणवल्याने आणि १८ ते २५ नोव्हेंबर या दरम्यान फिनलंड येथे प्रवास करून आल्याने रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचा घशातील द्रवाचा नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आला. सध्या दररोज रुग्णाच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. किमान १० दिवस विलगीकरणात ठेवण्यात येईल, असा अंदाज व्यक्त करणात आला आहे.
ओमिक्रॉन बाधित रुग्णाबरोबर प्रवास केलेल्या व्यक्ती, कुटुंबातील सदस्य, सोसायटीतील सदस्य, कामवाली, आदींची तपासणी करण्यात आली.
रुग्णाच्या संपर्कातील ४३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ओमायक्रॉनचा शहरात शिरकाव झाला असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग अशा कोरोना प्रतिबंधक वर्तनाचे आवर्जून पालन करावे असे आवाहन पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी केले.
