मनपा पदोन्नती घोटाळा प्रकरणी आप तर्फे पोलिस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार
पुणे :बोगस इंजिनिअर डिप्लोमा प्रमाणपत्राच्या आधारे पुणे महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठी पदोन्नती मिळवण्यासाठी पालिकेत चालू असलेले रॅकेट काल आम आदमी पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन उघड करण्यात आले होते. यावेळी या एकंदरीतच घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि एकंदरीत सद्यस्थितीतील पदोन्नती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. ज्यांनी ज्यांनी इंजिनिअर डिप्लोमा प्रमाणपत्र सादर केलेली आहे त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी देखील आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली होती.
एकंदरीत या प्रकरणात पुणे महानगरपालिकेची, राज्य शासनाची आणि जनतेची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झालेली आहे. बोगस इंजिनीयर डिप्लोमा प्रमाणपत्र सादर करुन पुणे महानगरपालिकेत कनिष्ट अभियंता पदी पदोन्नती मिळवण्याच्या/ देण्याच्या या रॅकेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवघेव, भ्रष्टाचार झालेला असण्याची शक्यता लक्षात घेऊन तसेच या अगोदरही अशा पद्धतीने इंजिनीयर पदासाठी अनेक बोगस जणांना प्रमोशन दिल्याच्या घटना लक्षात घेता आज आम आदमी पक्षातर्फे पुणे शहर पोलीस कमिशनर श्री अमिताभ गुप्ता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे अधीक्षक राजेश बनसोडे यांना निवेदन देण्यात आले.
पुणे महानगरपालिकेच्या २०२१ मधील कनिष्ट अभियंता (स्थापत्य) पदोन्नती भरती प्रारूप सेवा जेष्ठता यादीतील १८ जण आणि विधी अधिकारी, पुणे महानगरपालिका यांच्या विधी विभाग जावक क्रमांक २७०२ दिनांक १५ डिसेंबर २०१७ च्या पत्रात उल्लेख केलेले ११ जण तसेच एकंदरीत बोगस इंजिनीयर डिप्लोमा प्रमाणपत्र सादर करुन पुणे महानगरपालिकेत कनिष्ट अभियंता पदी पदोन्नती मिळवणारे कर्मचारी, ते मंजूर करणारे अधिकारी आणि एकंदरीत रॅकेटची चौकशी करुन फसवणूक, भ्रष्टाचार, अवैध आर्थिक देवाण-घेवाणचे गुन्हे नोंदवण्यात यावेत, अशी मागणी यावेळी आम आदमी पक्षाच्या वतीने प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे आणि रोहन रोकडे यांनी केली.
