कला हे शरद पवार यांचे औषध – विठ्ठलशेठ मणियार
पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे वयाची 81 वर्षे उलटली तरी राज्यासह देशातील विविध कार्यक्रमात सहभागी होत असतात. दोन – तीन तासांचा प्रवास करूनही कार्यक्रमात टवटवीत फुलाप्रमाणे असतात, कारण त्यांचे संगीत, कला, साहित्य यावर असणारे प्रेम. कायम प्रफुल्लित असण्यामागे कला हेच पवार यांचे औषध आहे, असे मत ज्येष्ठ उद्योजक विठ्ठलशेठ मणियार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दीवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत चित्रकार आणि शिल्पकार यांचा सहभाग असणारा “चित्र-शिल्प संवाद” हा एक आगळा वेगळा उपक्रम दि. 8 ते 12 डिसेंबर 2021 या काळात पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन बालगंधर्व रंगमंदिर येथे विठ्ठलशेठ मणियार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, आयोजक ‘दीवा प्रतिष्ठान’चे संस्थापक दीपकभाऊ मानकर, महापालिका विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, दीवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष करण मानकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस कला व सांस्कृतिक विभाग जिल्हा अध्यक्षा प्रिया बेर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस कला व सांस्कृतिक विभाग पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सुरेखा कुडची, ज्येष्ठ चित्रकार मुरलीधर लाहोटी, शिल्पकार विवेक खटावकर, बापूसाहेब झांजे, दत्ता सागरे, निलेश आर्टिस्ट आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना विठ्ठलशेठ मणियार म्हणाले की, पवार यांचे कार्य कर्तृत्व महाराष्ट्राला सांगायची गरज नाही. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दीपक मानकर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. या प्रदर्शनात पवार साहेबांचे अनेक दुर्मिळ फोटो त्यांनी जमा केल्याचे दिसते. शरद पवार यांच्या कला, संगीत, साहित्य विश्वातील आठवणींना उजाळा दिला.
प्रास्ताविक भाषणात दीपक मानकर म्हणाले की, शरद पवार माझे दैवत आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील चित्रकार, शिल्पकार यांना एकत्रित करून वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे, या प्रदर्शनातील चित्रे आणि शिल्प बारामती येथे एका हॉल मध्ये ठेवण्याचा आमचा मानस आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर आभार योगेश सुपेकर यांनी मानले.
पहिले शिल्प महापौरांचे
‘चित्र शिल्प संवाद’ या उपक्रमात 30 हुन अधिक दिगग्ज कलाकार सहभागी होणार आहेत. चित्र-शिल्प संवाद उपक्रमाच्या उद्घाटनानंतर शिल्पकार विपुल खटावकर आपले प्रात्यक्षिक सादर करणार होते. दीपक मानकर यांनी उपक्रमातील पहिले शिल्प पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे साकारण्याचा मानस व्यक्त केला आणि महापौर मोहोळ यांनीही तात्काळ संमती दिली व विपुल खटावकर यांनी महापौरांचे शिल्प साकारले.
