डॉ. बाबासाहेब आंबेडकर आजही देशाच्या केंद्रस्थानी -विनोद शिरसाठ
पुणे : देशाच्या प्रगतीत आणि विचारविश्वात आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्रस्थानी आहेत असे विधान साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रस्तुतता’ या विषयावरील व्याख्यानात विनोद शिरसाठ बोलत होते. या व्याख्यानाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
विनोद शिरसाठ म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समकालीन तर होतेच पण जसा काळ पुढे जातो आहे तशी त्यांची स्वीकारार्हता अधिक वाढत आहे.
शिरसाठ पुढे म्हणाले, १८९१ ते १९२१ या कालावधीत डॉ आंबेडकरांच्या विचार व अभ्यासाची भक्कम पायाभरणी झाली त्यामुळे पुढील ३५ वर्षे त्यांनी आर्थिक, सामाजिक राजकीय प्रतिकुलतेत काम केले. त्यांनी जातीव्यवस्थेची चिकित्सा करताना आंतरजातीय विवाह हाच जातीव्यवस्था उखडून टाकण्याचा उपाय असल्याचे सांगितले. सर्व घटकांचा सहभाग, संविधानिक नैतिकता, मानवी हक्क आणि स्वराज्य या संकल्पना याबाबत डॉ. आंबेडकर यांचे विचार आणि त्यामागील हेतू हे देखील शिरसाठ यांनी स्पष्ट केले.
आजच्या भाषणातून तरुणांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे आकलन आणि विश्लेषण कसे केले जाते याचा विचार करायला हवा, असे मत डॉ. मनोहर जाधव यांनी व्यक्त केले.
नव्या पिढीला शिक्षण घ्या असे सांगताना त्यांनी कोणते शिक्षण घ्यावे हे सांगत ‘शहाणं’ करणं आवश्यक आहे. पुढील काळात इंडस्ट्री ४.० ही औद्योगिक क्रांती होत असताना कष्टकऱ्यांच्या मुलांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, व्हर्च्युअल रिऍलिटी आदी गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.
– डॉ. एन.एस.उमराणी, प्र-कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
