येवला मुक्तीभूमीला ‘ब’ वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा; महापरिनिर्वाण दिनी सरकारची मोठी घोषणा
मुंबई : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली, अशा येवला मुक्तीभूमी या ऐतिहासिक स्थळाला महाराष्ट्र शासनाने डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ‘ब’ वर्ग तीर्थ स्थळाचा दर्जा दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येवला भूमीचे इतिहासात अनन्य साधारण महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेबांचा वारसा जपण्यासाठी महाविकास आघाडी शासनाच्या वतीने देशभरातील अनुयायांना ही विशेष भेट दिली आहे. याबाबत शासनाच्या वतीने शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
ऐतिहासिक महत्व असलेल्या येवला मुक्तीभूमीला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे प्रयत्न होते. त्यांच्या विशेष प्रयत्नाने या प्रस्तावास आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मंजुरी देण्यात आली असून, शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. येवला शहर हे नाशिक निफाड औरंगाबाद रस्ता व मालेगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर रस्त्यावरील एक महत्त्वाचे ऐतिहासिक शहर आहे. या निर्णयामुळे मुक्तीभूमीच्या विकासाला अधिक चालना मिळेल, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. याठिकाणी दरवर्षी 13 ऑक्टोबर, विजयादशमी, 14 एप्रिल तसेच प्रत्येक पोर्णिमेच्या दिवशी लाखो अनुयायी येत असतात. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित असतो. यास्तव या जागेस तीर्थक्षत्राचे स्वरुप तयार झालेले आहे.
