fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

पुण्यातील ‘या’ तीन नामांकीत बांधकाम व्यवसायिकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे : येथील तीन नामांकित बांधकाम व्यवसायिकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश मनोहर येवले, शाम जग्गनाथ शेंडे आणि सुनील पोपटलाल नहार अशी या बांधकाम व्यावसायिकांची नावे आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र बाळानाथ भुंडे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

अस्तीत्वात नसलेला रस्ता दाखवून बांधकाम आराखडा मंजूर करून घेतल्याचा या तिघांवर आरोप आहे. त्याचबरोबर, फिर्यादी राजेंद्र भुंडे यांचे इमारती खालील पार्किंग परस्पर इतरांना विकून फसवणूक केल्याचा आरोप देखील या तिघांवर आहे. बावधन येथील पेब्बल अरबनिया या बांधकाम प्रकल्पात हा सर्व गैरप्रकार घडला आहे.

राजेंद्र भुंडे हे मूळ जागा मालक आहेत. त्यांनी येवले, शेंडे आणि नहार यांच्या एएसआर प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स या भागीदारी फर्मला पेब्बल अरबनिया या गृह प्रकल्पासाठी काही जागा दिली आहे. या प्रकल्पाच्या जवळ भुंडे यांची दुसरी पाच गुंठे जागा आहे. हि जागा त्यांनी येवले यांना दिलेली नाही. मात्र, या जागेतून येवले यांनी बेकायदा रस्ता बनवल्याचे भुंडे यांचे म्हणणे आहे. रस्त्याच्या वादातून भुंडे यांनी पीएमआरडीए , जिल्हाधिकरी कार्यालय येथून अधिक माहीती घेतली असता, धक्कादायक माहीती समोर आली. अस्तित्वातच नसलेला १२ मीटरचा रस्ता दाखवून येवले यांनी बांधकाम आराखडा मंजूर करून घेतल्याचे भुंडे यांच्या निदर्शनास आले. तसेच, आजही प्रत्यक्षात ज्या ठिकाणी घरे आहेत त्या जागी रस्ता असल्याचे दर्शवून येवले यांनी पीएमआरडी कडून बांधकाम आराखडा मंजूर करून घेतला आहे. त्यासाठी भुंडे यांनी गुगल नकाशे आणि छायाचित्रे सादर केली आहेत. या प्रकल्पात सदनिकांबरोबर भुंडे यांना दिलेले पार्किंग येवले यांनी परस्पर इतरांना विकून फसवणूक केली आहे. या गुन्ह्यातील एक आरोपी शाम शेंडे यांनी शासकीय कागदपत्रात काही ठिकाणी स्वःताच्या नावाचा शाम वाणी असा उल्लेख केला आहे. फसवणुकीच्या उद्देशाने त्यांनी दोन वेगवेगळी नावे वापरली असल्याचे एफआयआर मध्ये म्हटले आहे.

भुंडे यांनी याविरोधात वेळोवेळी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, हिंजवडी पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. भुंडे यांनी सादर केलेली कागदपत्रे आणि त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर हा गुन्हा गंभीर आणि दखलपात्र असल्याचे सांगत न्यायालयाने, गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. 
 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading