fbpx
Sunday, May 12, 2024
Latest NewsPUNE

पुणे शहर भाजपच्या नवीन वास्तूतील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्या उद्घाटन : शहराध्यक्ष जगदीश मुळीक

पुणे शहर भाजपच्या नवीन वास्तूतील कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते उद्या शुक्रवारी  सायंकाळी साडेपाच वाजता होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून पुणे शहर भाजपाचे कार्यालय बुधवार पेठेतील जोगेश्वरी मंदिराच्या शेजारील इमारतीत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीच्या पूर्वी जंगली महाराज रस्त्यावरील ‘हॉटेल सन्मान’ येथे शहर कार्यालय स्थलांतरित केले होते.

कार्यालयाच्या कामकाजासाठी असलेली अपुरी जागा, पार्किंग, शहराचा वाढता विस्तार, भाजपाच्या कामातील नागरिकांचा वाढता सहभाग आणि अपेक्षा लक्षात घेऊन पुणे शहर भाजपा कार्यालय उद्यापासून महापालिका भवनासमोरील नवीन जागेत स्थलांतरित होत आहे.

साडेचार हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या प्रशस्त जागेत कार्यालयाचे अत्याधुनिक सोयीसुविधांनी आणि संपर्काच्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञानक्षम कार्यालय बनविण्यात आले आहे. बैठक कक्ष, स्वतंत्र पदाधिकारी कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. या नवीन वास्तूच्या माध्यमातून पुणे शहरातील भाजपाचे जनसेवेचे काम जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचेल आणि भाजपा दिवसेंदिवस अजून संघटनात्मक रित्या सशक्त होत जाईल असा विश्वास मुळीक यांनी व्यक्त केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय, खासदार प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या, चित्रा वाघ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहाणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading